
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी हा अत्यंत दुर्गम भाग आहे. तालुका झरी जामनी तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून प्रचलित आहे. महाराष्ट्र शासनाने करोडो रुपये खर्च करून येथे शासकीय ग्रामीण रूग्णालय बांधले आहे. या दुर्गम भागात खाजगी डॉक्टरसुद्धा अभावानेच आहेत. यामुळे झरीचे शासकीय रुग्णालय हे या भागातील एकच मोठे रुग्णालय असल्याने या रुग्णालयात रुग्णांची मोठी वर्दळ असते. या रुग्णालयात डॉक्टर्स आहेत पण शासकीय काम संभाळणारे कार्यालयीन कर्मचारी मात्र गायब असतात. यामुळे रुग्णालयीन कार्यव्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे.
शासनाने आरोग्य व्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी बायो मॅट्रिक हजेरी प्रत्येक रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात अनिवार्य केली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना बायो मॅट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. असे असूनही या रुग्णालयातील थम्ब अटेंडन्स मशीन धूळखात पडली आहे. त्यामुळे रुग्णालयाची बाकी इतर शासकीय कामे आणि पत्रव्यवहार थांबल्याने याचा रुग्णालयीन प्रशासनावर विपरीत परिणाम होऊन रुग्णांना याची झळ पोहचत आहे.
झरी हा यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भाग आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्तेसुद्धा व्यवस्थित नाहीत यामुळे या भागाला भेट देण्यासाठी अधिकारीवर्ग सुद्दा फारसे उत्सुक नसतात. याचाच फायदा येथील कर्मचारी वर्ग उचलत असल्याचे चित्र आहे. बिनपरवानगी गैरहजर राहून ज्या दिवशी कार्यालयात उपस्थित होतात त्यादिवशी अनुपस्थित दिवसांच्या हजेरी पटावर हजेरी लावून मोकळे होतात. पण अधिकारीवर्ग याकडे साफ दुर्लक्ष करतात. यामुळे या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर आपले खाजगी व्यवसाय सुरू केले असून पगारी सुट्ट्यांवर राहून आपला व्यवसाय वाढवीत आहेत.