
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला येऊन पोहोचला. जिल्हा परिषद गटात येणाऱ्या मौजे लोणेरे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी झाले. वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी गोरेगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार नरेश आयरे, रायगड जिल्हा संघटक स्विटी गिरासे, वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी, लोणेरे पंचायत समिती उमेदवार प्रभाकर ढेपे हे उपस्थित होते.
यावेळी उमेदवार नरेश आयरे म्हणाले की, आम्ही युवा-महिला सक्षमीकरण, क्रीडा संकुल व खेळाडू कौशल्य विकसित करणे, सौरदिवे व सीसीटीव्ही प्रकल्प, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना इत्यादी मुद्यावर ही निवडणूक लढवत आहोत. विकासकामे करणे व जनतेला सुखसुविधा देणे हेच ध्येय पुढे ठेवत निवडणुकीला सामोरे जात आहोत. यावेळी वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुकाध्यक्ष रोहन साळवी म्हणाले की, विकासकामे करणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देत असून गोरेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवारांना आमच्या पक्षाकडून जाहीर पाठिंबा देत आहोत.
कर्जत – पोसरीत अपक्ष उमेदवारावर हल्ला
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कडावं जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार भगवान मुने यांच्यावर पोसरी गावात प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी भगवान मुने हे कडावं जिल्हा परिषद गटातील पोसरी गावात घरोघरी जाऊन प्रचार करत असताना तोंडाला रूमाल बांधून आलेल्या एका अज्ञात इसमाने अचानक त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. हल्ल्यानंतर भगवान मुने यांनी तत्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. हल्लेखोराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

























































