
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भिवंडीसह पालघर, डहाणू, तलासरी व वसईतील सुमारे अकरा एकर जमीन हस्तांतरित करण्यास वन विभागाने आज मान्यता दिली आहे. या भागात आरक्षित वने, खासगी वन जमिनी आणि तिवरांच्या जंगलांचा समावेश आहे. त्यामुळे या जंगलांचा प्रकल्पासाठी बळी जाणार आहे.
या भागात बुलेट ट्रेनसाठी भुयारीकरणाबरोबरच वळणदार रस्ते वळविणे, सब-मेंटेनन्स डेपो, पूल तसेच अन्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मात्र या प्रकल्पासाठी जंगलाचा बळी जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे .
सुमारे 508 किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून नुकताच पालघरमधील एमटी-6 या बोगद्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता सरकारने पालघरमधील 4.798 हेक्टर वनजमिनी या प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. बुलेट ट्रेनसाठी पालघरमध्ये होणाऱया सात बोगद्यांपैकी दोन बोगदे तसेच पूल या 4 हेक्टर परिसरात होणार आहेत. यामुळे जंगले नष्ट होणार आहेत.
पालघरमधील राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाला ठाणे आणि पालघर जिह्यातील सुमारे 324 एकर वन जमीन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक असलेली आणखी 4.798 हेक्टर वनजमीन रेल्वे महामंडळाला प्रदान करण्यास राज्य सरकारचे महसूल व वने विभागाने मान्यता दिली. या परिसरात भागात एमटी-3 आणि एमटी-4 हे दोन बोगदे होणार आहेत. यातील एमटी 3 हा बोगदा 1 हजार 403 मीटर लांबीचा असून एमटी 4 हा बोगदा 1260 मीटर लांबीचा आहे. वसई तालुक्यात हे भुयारीकरण होणार असून हा संपूर्ण भाग संरक्षित वनाअंतर्गत येत असल्याने याला वन विभाग तसेच पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. ही परवानगी आल्यानंतर सरकारने ही जमीन रेल्वे महामंडळाला देण्यास मान्यता दिली आहे.
27.4 किमीचे बोगदे
प्रकल्पाच्या संपूर्ण मार्गात 27.4 किमी लांबीचे बोगदे निर्माण करण्यात येत आहेत. यात 21 किलोमीटर भूमिगत, तर 6.4 किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी आठ बोगदे बांधले जात असून सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी 6.05 किमी आहे, तर एक 350 मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते वांद्रे-पुर्ला संपुल 5 किमी भूमिगत बोगदा असून त्याचे काम सप्टेंबर 2025मध्ये पूर्ण झाले आहे.






























































