
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळीसह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सरकार आणि स्थानिक मंत्री, आमदार केवळ राजकारणात मग्न आहेत, अशी खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही हल्ला चढवला. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? असा बोचरा सवाल राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, कालच्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी आणि इतरांना फार मोठा फटका बसला आहे. अशावेळी सरकार, पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील आमदारांकडून तत्काळ संवेदना व्यक्त करणे गरजेचे असते. पण तसे होताना दिसत नाही. पालकमंत्री, मंत्री, आमदारांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तत्काळ मदत मिळावी यासाठी पावले उचललेली दिसत नाही. पंजनामे, मोजण्या होतील, पण त्यात काही अर्थ नाही. शेतदकऱ्यांच्या घरात कालपासून आकांत दिसतोय, पण हे सरकार अत्यंत असंवेदनशिल आहे. विशेषत: मंत्रिमंडळात जळगावमधील जे लोक आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या असून 24 तास राजकारणात मग्शूल आहेत.
संकटमोचक म्हणतात ते गिरीश महाजन कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या संकटात हे मोचक कुठे असतात? राजकारणात फक्त राजकीय संकटमोचक असतात का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, जनतेवर संकट येते, शेतकऱ्यांवर संकट येते तेव्हा हे संकटमोचक काही करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणे, नगरसेवक पळवणे, पक्ष फोडणे हे संकटमोचकाचे कर्तव्य आहे. हे राज्याचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू असल्याचा हल्लाही केला. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वत:ला वर्दीतील गुंड मानू नये. वर्दीतील गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. जशी लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते. नाव लोकशाहीचे, पण अनेक देशांमध्ये लष्करी गणवेशातील हुकुमशाही असते, तशी जळगावमध्ये पोलीस गणवेशातील हुकुमशाही आहे. त्याचा वापर सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री, मंत्री, आमदार राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार… हे चित्र स्पष्ट असून या भागातील शिंदे गटाचे आमदार संकटमोचकाच्या संपर्कात असून पुढली निवडणूक ते भाजपमधून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे, असे राऊत म्हणाले.



























































