जानाईच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या पिकअपला अपघात एक महिला ठार, 17 जखमी; पाटणमधील जळव घाटात दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाई देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप जीप तारळे विभागातील जळव घाटात पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एक महिला भाविक ठार; तर 17 जण जखमी झाले. आज सकाळी ही दुर्घटना घडली. सर्व अपघातग्रस्त कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावचे रहिवासी आहेत.

लक्ष्मी विठ्ठल काकडे (वय 55, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे अपघातातील मृत भाविकाचे नाव आहे. या अपघातात प्रभावती एकनाथ कानडे, एकनाथ राजाराम काकडे, दाजी गणपती खताळ, केशव ज्ञानबा जगदाळे, आबाजी बापूराव खताळ, शकूबाई आबाजी खताळ, छाया गणेश खताळ, शंकर बापू खताळ, शालन नाना खताळ, सिंधू नंदकुमार शिंदे, विठ्ठल दिनकर काकडे, लता राजेंद्र खताळ, पंढरीनाथ बबन काकडे, प्रल्हाद भैरू काकडे, रुक्मिणी प्रल्हाद काकडे, लोचन किरण शिंदे, किरण किसन शिंदे (सर्वजण रा. हिवरे) हे जखमी झाले. यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिवरे गावातील भाविक भाडय़ाने पिकअप जीप करून पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाई देवीच्या दर्शनाला निघाले होते. तारळे गाव ओलांडून पुढे गेल्यानंतर मरळोशी (ता. पाटण) गावच्या हद्दीत जळव घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी झाली. घटनास्थळी महिला भाविकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तारळे व सातारा येथील रुग्णालयात हलविले. जखमींपैकी लक्ष्मी विठ्ठल काकडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तारळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पिकअपचालक बापू संभाजी खताळ (रा. हिवरे, ता. कोरेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.