जेएनपीएच्या 37 कोटींच्या ई-स्पीड बोटींना वेगच नाही; प्रवासी सेवा सहा महिन्यांपासून लांबच

गेट वे ते जेएनपीए हा सागरी प्रवास ४० मिनिटांत पूर्ण करण्यासाठी जेपीटीने ३७ कोटी रुपये खर्चुन दोन ई-स्पीड बोटी आपल्या ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या बोटींनी हे अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यातच प्रवासी क्षमता, तांत्रिक अडचणींचाही फटका बसत असून मागील सहा महिन्यांपासून या बोटींचे जलावरण लांबले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा करूनही ई-स्पीड बोटींना वेगच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जेएनपीए-मुंबई या सागरी मार्गावरील वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटी खर्चिक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या ई-स्पीड बोटी घेण्याचा निर्णय घेतला होता. फायबरच्या हलक्या असलेल्या ई-स्पीड बोटी १० वर्षाच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीचे काम देण्यात आले आहे. यासाठी जेएनपीए ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्च करणार आहे.

२० सप्टेंबरपासून चाचणी

उन्हाळी हंगामात २०-२५ प्रवासी व पावसाळी हंगामात १०-१२ क्षमतेच्या असलेल्या या दोन स्पीड बोटी फेब्रुवारी २०२५ पासूनच सेवेत दाखल होणार होत्या. मात्र स्पीड बोटींचा वेग, प्रवासी वाहतुकीची क्षमता त्यात सदोष चार्जिंग प्रणालीमुळे प्रवासी वाहतुकीला फटका बसत आहे. आता २० सप्टेंबरपासून चाचणी घेतल्यानंतर या बोटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.