
>> दिलीप ठाकूर
चित्रपटाचे जग अतिशय विचित्र आहे, एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक कालांतराने मुख्य प्रवाहातून बाजूला सरल्यावर ती व्यक्ती आज नेमकी पुठे आहे? कशा पध्दतीचे आयुष्य जगतेय, याची कोणतीही माहिती वा तपशील मिळत नाहीत, अथवा चित्रपटसृष्टीही त्याबाबत अनभिज्ञ असते. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक एन. डी. कोठारी यांच्याबाबत हेच झाले आणि 21 ऑक्टोबर 2025 रोजी बातमी आली की, एन. डी. कोठारी यांचे नवीन मुंबईतील नेरुळ येथे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे इतके होते. एकेकाळी विलेपार्ले येथे त्यांच्या मेवाड फिल्म या चित्रपटनिर्मिती संस्थेचे अतिशय प्रशस्त कार्यालय होते. जवळपास पंचवीस-तीस वर्षे एन. डी. कोठारी चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर होते. आणि त्यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांनी निर्माण केलेल्या बहुचर्चित चित्रपटाची आठवण आली.
एन. डी. कोठारी हे राजस्थानमधील देवगड येथील. राजस्थानबद्दल त्यांना कायमच प्रेम. म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेचे नाव मेवाड फिल्म असे ठेवले. ते वृत्तीने कमालीचे धार्मिक होते. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत चित्रपटनिर्मितीत पाऊल टाकल्यावर त्यांनी पौराणिक चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिले. त्या काळातील पौराणिक, धार्मिक चित्रपट दिग्दर्शनात अतिशय आघाडीवर असलेल्या धीरुभाई देसाई यांजकडे दिग्दर्शन सोपवत ‘बद्रीनाथ यात्रा’ (1967) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या यशानंतर एन. डी. कोठारी यांनी बाबुभाई मिस्त्री यांजकडे दिग्दर्शन सोपवत ‘भगवान परशुराम’ (1970) आणि ‘नागपंचमी’ (1972) या दोन पौराणिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर ते देमार घेमार अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटनिर्मितीकडे वळले.
रशियन दिग्दर्शक अकिरा पुरोसावा यांच्या ‘सेव्हन सामुराई’ या चित्रपटातील मध्यवर्ती सूत्रावर आधारित एकाच वेळी शिबू मित्रा दिग्दर्शित ‘खून की किमत’ आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हे दोन चित्रपट आपापल्या पद्धतीने निर्माण होत असतानाच त्याच मध्यवर्ती सूत्रावर काही मनोरंजनाच्या मसाल्यावर आधारित ‘खोटे सिक्के’ या चित्रपटाची निर्मिती कोठारी यांनी केली. सुरुवातीला राजेश खन्नाला ‘काऊ बॉय’ शैलीचा नायक बनवायचे ठरवले. पण त्या काळात तो अतिशय कार्यरत असल्याने फिरोज खानची निवड केली आणि राजस्थानातील एका गावात जाऊन एका मोठय़ा चित्रीकरण सत्रात बराचसा चित्रपट पूर्ण केला.
या चित्रपटातील किशोर कुमारने पार्श्वगायन केलेले आणि राहुल देव बर्मन यांचे संगीत असलेले ‘जीवन मे तू कभी डरना नहीं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटानंतर एन. डी. कोठारी यांनी निर्मितीसह दिग्दर्शनात पाऊल टाकले. आणि 1979 साली ‘सरकारी मेहमान’,1991 साली ‘धरम संकट’ या महाखर्चिक मारधाड चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. राजस्थानमधील अनेक ठिकाणी त्यांनी चित्रीकरण केले. काही कारणास्तव हा चित्रपट पडद्यावर येण्यास उशीर झाला. या चित्रपटानंतर एन. डी. कोठारी यांची व्यावसायिक घसरण सुरू झाली. तरी 1995 पर्यंत ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. दरम्यान ‘डिव्होर्स’ वगैरे आणखी काही चित्रपटांची निर्मिती केली. आता चित्रपटनिर्मितीत बरेच बदल झाले होते. वातावरण बदलले होते. चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि दिग्दर्शकाच्या कार्यक्रमांना ते हमखास भेटत. नंतर तेही कमी कमी होत गेले. त्यांनी निर्माण केलेल्या बहुचर्चित चित्रपटामुळे ते आठवणीत राहतील हे निश्चित.






























































