
कुर्ला रेल्वे पोलिसांनी जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे राहणाऱया हेमराज खुर्शीद अहमद यात्तू याला दिवाळीत एक भेट दिली. वर्ष 2018 मध्ये एका गुह्यात जप्त केलेली आपाची दुचाकी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मूळ मालक यात्तूला तिकडे जाऊन दिली. शारीरिक अडचणींमुळे यात्तूला मुंबईत येणे शक्य नसल्याने पोलीसच त्याच्या दारात धडकले.
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी बरीच वर्षे धूळ खात पडून होती. वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांच्या निर्दशनास ही बाब आल्यानंतर उपनिरीक्षक विजय कपिले, प्रदीप शिंदे, कस्तुरी झिमन यांनी त्या दुचाकीशी संबंधित कागदपत्रे तपासली तेव्हा वर्ष 2021 मध्ये न्यायालयाने ती दुचाकी मूळ मालकाला परत करण्याचे आदेश जारी केल्याचे समोर आले. कपिले व पथकाने मेहराज यात्तू या मालकाला संपर्क साधून दुचाकी घेऊन जाण्यास सांगितले. परंतु पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याला कश्मीरहून मुंबईला येणे शक्य होणार नव्हते. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने कुर्ला रेल्वे पोलीस ती दुचाकी मेहराज यात्तू (50) याला पुलवामा येथे जाऊन देणार असे ठरले होते. त्यानुसार विजय कपिले, वेंकट जाधव, संजय गुंजाळ यांनी वांद्रे-जम्मू तावी एक्स्प्रेसने दुचाकी तेथे नेली. मग पुढे जम्मू तावी ते पुलवामा पोलीस स्टेशन अशी स्कॉर्पिओ गाडीवर बांधून दुचाकी नेली. गाडीचा पंचनामा व फोटोसह त्यांचा एक लाख 10 हजारचा ई-स्टॅम्पवर बॉण्ड घेऊन यात्तू याला त्याची दुचाकी सुपूर्द केली. कुर्ला रेल्वे पोलिसांचे सहकार्य पाहून यात्तू व त्यांचे नातेवाईकदेखील अचंबित झाले.
























































