
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली आहे. त्यांनी बिहारला ‘देशाचे क्राइम कॅपिटल’ (गुन्हेगारीचे केंद्र) बनल्याचा आरोप केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही टीका केली असून, नीतीश कुमार हे आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असल्याचे आणि भाजपचे मंत्री कमिशन मिळवण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “बिहार हिंदुस्थानचे ‘क्राइम कॅपिटल’ बनले आहे. प्रत्येक गल्लीत भीती, प्रत्येक घरात अस्वस्थता, बेरोजगार तरुणांना ‘गुंडा राज’ हत्यारे बनवत आहे. मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत, तर भाजपचे मंत्री कमिशन कमावण्यात गुंतले आहेत.” त्यांनी पुढे म्हटले की, यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नाही, तर बिहारला वाचवण्यासाठी आहे.