
राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओ झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. आधी खरात फाईल्स आणि त्यानंतर झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ यामुळे राज्यातील राजकारण तापलेले असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरहरी झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधला आणि हा व्हिडीओ तीन-चार व्हिडीओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे म्हटले. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. यावर मी त्यांना तात्काळ तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. या व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल आणि सत्यता पडताळून अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही योग्य निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मंत्री नरहरी झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया pic.twitter.com/CHUtTHNQEr
— Saamana Online (@SaamanaOnline) March 27, 2026
काही दिवसांपूर्वी झिरवाळांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचखोरीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, मागच्या काळात जी घटना घडली त्याची पूर्ण चौकशी झाली. त्यात कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडीओ समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे हे अत्यंत गरजेचे आहे. ते व्हिडीओ जर सत्य असतील तर त्याची योग्य ती कारवाई होईल, असेही फडणवीस म्हणाले.






























































