महायुतीत रुसवेफुगवे सुरूच, अधिवेशन सोडून मिंधेंची दिल्ली दरबारी धावाधाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारमध्ये मिंधे गटात नेत्यांचे रुसवेफुगवे सुरूच आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपकडून शिंदे गटाला डावलण्यात आले. यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत धावाधाव सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या.

महाराष्ट्रात विधिमंडळाच्या अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर झालेले असताना सभागृहात उपस्थित राहण्याचे सोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी तातडीने दिल्ली गाठली. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. युद्धामुळे देशावर उद्भवलेल्या परिस्थितीत आपला पक्ष पेंद्र सरकारसोबत असल्याची ग्वाही पंतप्रधानांना भेटून दिली. या भेटीआधी त्यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेते आणि पेंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली. शिंदे यांनी मुंबईतील अधिवेशन सोडून दिल्ली गाठल्याने महायुतीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा. उद्योगमंत्री उदय सामंत मंगळवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले.

राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार

राज्यातील निवडणुकांत अनेक मतदारसंघांमध्ये शिंदे गटाला भाजप आणि मित्रपक्षांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. यामुळे आपल्या उमेदवारांचा पराभव झाला, असा एक अंतर्गत अहवाल शिंदे गटाने तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार भाजपच्या वरिष्ठांकडे केल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱयावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पेंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत.