अस्वच्छता कराल तर खबरदार… क्लीनअप मार्शलकडून पाच महिन्यांत 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल

मुंबईला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी उघडय़ावर अस्वच्छता करणाऱयांना जरब बसवण्यासाठी क्लीनअप मार्शलकडून दंड वसूल करण्यात येत आहे. यामध्ये एप्रिलपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत 1 कोटी 72 लाख 76 हजार 812 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या 25 पैकी 22 वॉर्डमध्ये ही कारवाई सुरू असून प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकी 30 क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. एकूण 59,888 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘क्लीनअप मार्शल’ पुरवणाऱया संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांविरोधात कारवाई थांबली होती. मात्र 2 एप्रिलपासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली. महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीनअप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीनअप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे. हा दंड टाळण्यासाठी मुंबईकरांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

हे करू नका, अन्यथा कारवाई

उघडय़ावर इतरत्र कचरा टाकणे       200 रुपये

उघडय़ावर थुंकणे                          200 रुपये

उघडय़ावर स्नान करणे                    100 रुपये

दुकानाबाहेर कचऱयाचा डबा न ठेवणे        500 रुपये

कचरा विभक्तीकरण करण न करणे    500 रुपये

प्राणी व पक्ष्यांना उघडय़ावर खाऊ टाकणे  500 रुपये

धोकादायक कचरा निर्देशित न करणे         500 रुपये