लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट, 100 मोबाईल लंपास

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत यंदाही लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. लालबाग ते गिरगाव चौपाटी असा सुमारे 32 ते 35 तासांचा प्रवास करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत निरोप दिला. मात्र भक्तीच्या उत्साहात गुन्हेगारांनी गर्दीचा फायदा घेत अनेक भक्तांच्या मोबाईल आणि इतर ऐवजावर डल्ला मारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मिरवणुकीदरम्यान मोबाईल चोरीच्या 100 हून अधिक घटना घडल्या. काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर तक्रार नोंदवण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी आतापर्यंत अधिकृतरीत्या 10 गुन्हे नोंदवले असून त्यापैकी 4 मोबाईल परत मिळाले आहेत आणि या प्रकरणांत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोबाईल चोरीव्यतिरिक्त अनेक भक्तांच्या सोन्याच्या साखळ्याही चोरी झाल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. अशा प्रकरणात आतापर्यंत 7 गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी दोन सोन्याच्या साखळ्या परत मिळाल्या असून 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भोईवाडा पोलिसांनी ड्रोनच्या वापराबाबतचे प्रकरणेही नोंदवले आहेत.

आतापर्यंत मोबाईल चोरीच्या प्रकरणांत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर चेन स्नॅचिंगच्या प्रकरणांत 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे 100 हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी मिळाल्या असून तपास सुरू आहे. दरवर्षीप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान, विशेषतः लालबाग परिसरात मोबाईल चोर आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट दिसून आला. यामध्ये शेकडो भाविक त्यांच्या कारवायांचे बळी ठरले.