तुटपुंज्या मानधनावर ते वाचवताहेत तुमचा जीव: 68 दुर्घटनामध्ये 107 जण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत असून किनाऱ्यावरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 2001 पासून 2018 पर्यंत जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील 68 दुर्घटनामध्ये 107 जणांचा बुडून मृत्यू झाला. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले. जीवरक्षकांनी स्व:ताच्या जीवाची बाजी लावून बुडणाऱ्या शेकडो पर्यटकांचे प्राण त्यांनी वाचवले. किनाऱ्यावरच्या सुरक्षेत महत्वपूर्ण काम करणाऱ्या जीवरक्षकांना मात्र सहा हजार रुपये महीना मानधन मिळत आहे. सहा हजार रूपयात घर खर्च कसा भागवावा ही विवंचना त्यांना आहे. हे मानधन वाढवून मिळावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुमद्र किनाऱ्यावर पर्यटक बुडून मृत्यू पडल्याच्या घटना जीवरक्षकांची नेमणूक झाल्या. दरवर्षी अनेक बुडणाऱ्या पर्यटकांना हे जीवरक्षक वाचवतात. त्यामुळे हे जीवरक्षक एकप्रकारे देवदूत ठरले आहेत. 2001 पासून बुडून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर एक नजर टाकूया. 2001 मध्ये 2 पर्यटक बुडून मृत्यू पावले, 2002 मध्ये 6 जण, 2003 मध्ये 9 जण, 2004 मध्ये 2 जण, 2004 मध्ये 0, 2005 मध्ये 2 जण, 2006 मध्ये 0, 2007 मध्ये 9 जण, 2008 मध्ये 11 जण, 2009मध्ये 11 जण 2010 मध्ये 3 जण, 2011 मध्ये 7 जण, 2012 मध्ये 11 जण, 2013 मध्ये 2 जण, 2014 मध्ये 10 जण, 2015 मध्ये 15 जण, 2016 मध्ये 0, 2017 मध्ये 5 जण, 2018 मध्ये 7 जण बुडून मृत्यू पावल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. 2009 ला गणपतीपुळ्यात 10 जण, 2007 ला गणपतीपुळ्यात 6 जण, 2012 ला गणपतीपुळ्यात 7 जण, 2015 मध्ये गुहागर येथे सात जण आणि 2018 मध्ये आरेवारे येथे पाचजण बुडाले या घटना अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. किनारीपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टिने उपाय योजना करणे गरजेचे आहे. यामध्ये जीवरक्षक खूप मोलाची कामगिरी करत आहेत.

कोकण ग्रामीण पर्यटन कार्यक्रमांतर्गत 13 समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येकी दोन जीवरक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येते. हि मानधनाची रक्कम वाढवावी. जीवरक्षकांना 14 हजार 812 रुपये मानधन आणि पाच हजार रुपये जोखीम भत्ता देण्यात यावा अशी मागणी ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडे राजू भाटलेकर यांनी केली आहे. जिल्ह्यात सध्या 26 जीवरक्षक असून अजून अन्य काही किनाऱ्यांवर 67 जीवरक्षक नेमणे गरजेचे असल्याची मागणी भाटलेकर यांनी केली आहे.