आठवड्याचे भविष्य – रविवार १५ ते शनिवार ते २१ जुलै २०१८

144

>>नीलिमा प्रधान

मेष
योजना मार्गी लागेल
व्यवसायात मजूरवर्ग व भागीदार यांच्याबरोबर वाद होईल. राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासाने ठरविलेला प्लॅन सर्वांना पटवून देण्यात कष्ट पडतील. सामाजिक कार्यात जनतेचे प्रेम मिळवता येईल. आर्थिक सहाय्य घेऊन योजना मार्गी लागेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. १६, २०.

वृषभ
प्रतिष्ठा लाभेल
सप्ताहाच्या शेवटी तुमच्याबद्दल गैरसमज होईल. राजकीय क्षेत्रात बुद्धिचातुर्याने तुमचे विचार मांडता येतील. प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कार्यात कुणालाही कमी लेखू नका. कुटुंबात जीवनसाथी व मुले यांच्याबरोबर तणाव होईल. खर्च वाढेल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नवीन परिचय उन्नतीसाठी उपयुक्त ठरेल.
शुभ दि. १५, १८.

मिथुन
चांगल्या व्यक्तींशी परिचय होईल
क्षेत्र कोणतेही असो तुमचे वर्चस्व वाढेल. राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय घ्या. व्यवसायात मोठा फायदा व मोठे काम मिळेल. दर्जेदार लोकांचा परिचय उत्साहवर्धक, आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कोर्टकेसमध्ये यशस्वी ठराल. मनातल्या योजना पूर्ण होतील. मात्र चौफेर लक्ष हवे.
शुभ दि. १५,१६.

कर्क
परदेशी जाण्याचा योग
आठवडय़ाचा प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल. व्यवसायातील कोणताही प्रश्न सोडवता येईल. चर्चा करून गैरसमज दूर करा. राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे सर्वांना पटतील. कौटुंबिक वातावरण पोषक राहील. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रांत तुमची चपळता दिसेल.
शुभ दि. १६,१८.

सिंह
मदतीची अपेक्षा नको
अहंकार व आत्मविश्वास याचा उपयोग करताना तारेवरची कसरत करावी लागेल. राजकीय क्षेत्रात आरोप होतील. सामाजिक कार्यात सहभागी होताना त्रास होईल. मनःशांतीच्या जोरावर मार्ग प्रत्येक वेळी मिळू शकेल. व्यवसायात समस्या येईल.कोर्टाच्या केसमध्ये मदतीची अपेक्षा ठेवू नका.
शुभ दि. १८, १९.

कन्या
डावपेच यशस्वी होतील
अडचणींवर मार्ग शोधता येईल. संयम ठेवा. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात महत्त्व कायम ठेवता येईल. सामाजिक कार्यात कोणतीही कुचराई करू नका. गुप्त कारवाया करणारे लोक ओळखून ठेवा. तुमचे डावपेच यशस्वी होतील. व्यवसायात जम बसेल. थकबाकी वसूल करा. शुभ दि. २०, २१.

तूळ
वादविवादांना महत्त्व नको
बुधवार, गुरुवार प्रेमात, कार्यात वाद होईल. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. ध्येयावर लक्ष ठेवा. राजकीय क्षेत्रात तडफदारपणे निर्णय घ्या. योजनांना पूर्ण करण्याची जय्यत तयारी करा. सामाजिक क्षेत्रात जवळचे लोक मदत करतील. नोकरी, व्यवसायात सर्व ठिकाणी तुमचे प्रयत्न सत्कारणी लागतील. शुभ दि. १५, १६.

वृश्चिक
कामात सावधानता बाळगा
आठवडय़ाच्या सुरुवातीला समस्येवर उपाय शोधता येईल. भ्रमात न राहता काम करा. सामाजिक क्षेत्रात सहजपणे लोकांची मने जिंकता येतात तशीच दुखावली जातात हे लक्षात घ्या. व्यवसायात लक्ष द्या. परीक्षण व निरीक्षण करूनच योग्य निर्णय घ्या. नोकरी, कोर्टकेस संबंधात सावधपणे काम करा. शुभ दि. १७, १८.

धनु
दिशाभूल होईल
कुटुंबात तुमच्या निर्णयावर टीका होईल. राजकीय क्षेत्रात तुमची दिशाभूल केली जाईल. वरिष्ठांचे निरीक्षण करा. मगच तुमचे मत बनवा. जनतेच्या अडचणी जाणून घ्या. कार्याची व्याप्ती वाढवा तरच पुढे तुमचा निभाव लागेल. नोकरी, व्यवसाय अथवा कोर्टकेस सर्वच ठिकाणी तुमच्यावर दबाव राहील.
शुभ दि. १९, २०.

मकर
मानसिक तणाव जाणवेल
रविवार, सोमवार मानसिक तणाव होईल. जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी चिंता कराल. राजकीय क्षेत्रात विरोधकांना उत्तरे देण्यापेक्षा तुम्ही कामावरून दाखवा. तुमचा डाव यशस्वी होईल. सामाजिक कार्यात जनतेची नाराजी होणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरी, परदेशात जाण्याचा योग येईल. क्रीडा क्षेत्रात चमकाल.
शुभ दि. १८, १९.

कुंभ
उतावळेपणा नको
प्रगतीने धावणारा तुमचा वारू रोखण्याचा प्रयत्न होईल. तुमचे खडे बोल राजकीय क्षेत्रात सर्वांना स्फोटक वाटतील. सामाजिक कार्यात टीकात्मक चर्चा होईल. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. व्यवसाय कोर्टकेसमध्ये उतावीळपणा नको. प्रतिष्ठा पणाला लावून यश खेचण्यापेक्षा जनतेच्या प्रेमानेच पुढे जाता येईल.
शुभ दि. २०, २१.

मीन
सामाजिक कार्याला स्वरूप मिळेल
राजकीय क्षेत्रात महत्त्वाची चर्चा करण्याची संधी मिळेल. संघषांतूनच तुमची प्रतिमा उजळेल. सामाजिक कार्यात चिडचिडेपणा करू नका. व्यवसायाला मोठे स्वरूप मिळेल. भागीदार वेगळय़ाच स्वरूपात तुमच्यासमोर येऊ शकतो. नोकरी, कोर्टकेसमध्ये गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा.
शुभ दि. १८.

आपली प्रतिक्रिया द्या