
जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांची डोकेदुखी ठरलेला मायक्रोसॉफ्टचा (Microsoft) तांत्रिक बिघाड तब्बल ३६ तासांहून अधिक काळानंतर अखेर दूर झाला आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी कंपनीने ही तांत्रिक समस्या पूर्णपणे सोडवण्यात आल्याचे जाहीर केले. यामुळे आउटलुक (Outlook), टीम्स (Teams), कोपायलट (Copilot) आणि इतर मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवा पुन्हा सुरळीत झाल्या असून, जगभरातील आयटी कंपन्या, सरकारी कार्यालये आणि वैयक्तिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या तांत्रिक बिघाडाचा फटका तब्बल ७० हून अधिक देशांतील व्यवसाय आणि सरकारी संस्थांना बसला होता. सेवा पूर्ववत झाली असली तरी कंपनी आपल्या पायाभूत सुविधा आणि प्रलंबित ईमेल्सवर (Email Backlogs) अद्याप लक्ष ठेवून आहे. या गैरसोयीबद्दल मायक्रोसॉफ्टने वापरकर्त्यांची माफी मागितली असून, नेमके काय बिघडले होते याचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.
कसा सुरू झाला बिघाड?
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी वापरकर्त्यांना ‘एक्सचेंज ऑनलाइन’ (Exchange Online) मेलबॉक्स उघडण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर हा बिघाड आउटलुक, टीम्स, कोपायलट, शेअरपॉईंट (SharePoint), प्लॅनर आणि टू-डू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामाच्या ॲप्सपर्यंत पसरला. टीम्सवरील मेसेजिंग आणि ऑनलाइन मीटिंग्ज बऱ्यापैकी सुरू होत्या, मात्र कॅलेंडर आणि मीटिंग शेड्यूलिंगवर मोठा परिणाम झाला. तसेच कोपायलट वापरकर्त्यांनाही चॅट लोड करणे आणि ईमेल्स किंवा फाईल्स मिळवण्यात अडचणी आल्या.

























































