
हिंदुस्थानला आता पाकिस्तानचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानला पराभूत केले होते. पण आता या आशिया चषक स्पर्धेचा थरार अंतिम टप्यात येऊन ठेपला आहे. कारण कट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान शनिवारी विजेतेपदासाठी स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजेतेपदावर नाव कोरून साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडिया सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे गतवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुस्थानचा पराभव करून आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद राखण्याची संधी पाकिस्तानकडे असणार आहे.
कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार
गतवर्षीप्रमाणे यंदाही 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये साखळी फेरीत पाकिस्तानने हिंदुस्थानला पराभूत केले होते. हिंदुस्थानचा अर्जुन राजपूत याने 107 धावांची शतकी खेळी साकारली होती. अर्जुन वगळता हिंदुस्थानचा इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी साकारू शकला नाही. त्यामुळे हिंदुस्थानचा डाव 208 धावांवर गडगडला होता. पाकिस्तानने 7 विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पार करत विजय साकार केला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.


























































