
<< राखी अरदकर
[email protected]
कधी कधी रोजच्या जगण्याच्या चौकटीतून बाहेर पडून एखाद्या वेगळ्या ठिकाणी काही दिवस राहण्याची संधी मिळते. सुरुवातीला तो केवळ कामानिमित्त केलेला मुक्काम असतो, पण तिथले वातावरण, माणसांची आपुलकी, निसर्गाची सोबत आणि तिथल्या जगण्याची पद्धत हळूहळू आपल्याला गुंतवून टाकते. माझ्यासाठी सध्या सुरू असलेले हे आठ दिवसांचे वास्तव्य असाच एक अनपेक्षित आनंद घेऊन आले आहे.
काही कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून एका गावात राहण्याचा योग आला आहे. आठ दिवसांसाठी घेतलेली ही छोटीशी निवासाची सोय मला एका वेगळ्याच अनुभवविश्वात घेऊन गेली आहे.
इथे आंघोळीसाठी गरम पाणी हवे असेल तर घरातील न्हाणीघराचा उपयोग केला जातो. मी ज्या काकींकडे राहते, त्यांनी माझ्यासाठी अगदी प्रेमाने चुलीवर पाणी तापवून दिले. चुलीवर तापवलेल्या पाण्याने आंघोळ करण्याचा अनुभव कितीतरी दिवसांनी मिळाला. आजच्या गॅस गिझरच्या आणि बटण दाबताच गरम पाणी मिळणाऱ्या काळात चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करणे ही एक वेगळीच सुखद अनुभूती होती. पाण्याच्या उबेबरोबरच त्या पाण्यात काकींनी दाखवलेल्या आपुलकीची ऊबही जाणवत होती.
इथली थंडीही अनुभवण्यासारखी आहे. संध्याकाळ झाली की थंडीची चाहूल लागते आणि पहाटेपर्यंत तर अक्षरश कुल्फी झाल्यासारखी अवस्था होते. अशा वेळी चुलीसमोर जाऊन हात शेकण्याचा मोह आवरत नाही. चुलीतल्या जळणाऱ्या लाकडांचा आवाज, त्यातून बाहेर पडणारी ऊब आणि हात शेकत बसण्याचा तो निवांत क्षण… मला नकळत बालपणात घेऊन जातो. पूर्वीच्या दिवसांत चुलीभोवती जमून गप्पा मारणे, शेकोटीची ऊब अनुभवणे या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. काही अनुभव असे असतात की, ते पुन्हा जगताना आपण किती सहजपणे आपल्या बालपणात परत जातो!
या घराच्या आजूबाजूला चिकूचे आणि आंब्याचे वृक्ष आहेत. बाजूलाच वांग्याची छोटी छोटी रोपे डोलत आहेत. सकाळ झाली की, चिकूच्या झाडावर पक्ष्यांची लगबग सुरू होते. कितीतरी सुंदर पक्षी तिथे येतात. त्यांची चिवचिव, झाडांच्या फांद्यांवरची हालचाल आणि सकाळच्या वातावरणात मिसळणारे त्यांचे आवाज मन प्रसन्न करतात. रात्री मात्र याच झाडांवर वटवाघळांची ये-जा सुरू होते. दिवसा आणि रात्री निसर्गाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते.
या सगळ्या वातावरणात राहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी किती सहजपणे निसर्गाकडून मिळत असतात. शहरात सतत धावपळ, वेळेची घाई, सोयीसुविधांची सवय आणि आजूबाजूला असणारा गोंगाट असतो. इथे मात्र दिवसाचा वेगळाच लयबद्धपणा आहे. झाडे, पक्षी, चूल, अंगण आणि माणसांमधली सहज आपुलकी…
कधी कधी एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी आपण काही दिवस जातो, पण ते ठिकाण आपल्याला जगण्याचा एक वेगळा अनुभव देऊन जाते. या आठ दिवसांत मला कोणतीही मोठी गोष्ट अनुभवायची नाही. फक्त सकाळी पक्ष्यांची चाहूल ऐकायची, झाडांकडे पाहायचे, चुलीवर तापवलेल्या पाण्याने आंघोळ करायची आणि या शांत वातावरणात स्वतसोबत थोडा वेळ घालवायचा आहे.
शहरापासून दूर आल्यावर शांततेचा अर्थ नव्याने समजतो. रोजच्या जगण्यात दुर्लक्षित राहणाऱ्या कितीतरी छोट्या गोष्टी इथे आनंद देऊन जातात. चुलीची ऊब, झाडांची सावली, पक्ष्यांची सोबत आणि माणसांची आपुलकी यात एक वेगळेच समाधान आहे.
काही दिवसांसाठी आपण एखाद्या ठिकाणी राहायला जातो, पण कधी कधी ते ठिकाण आपल्याला पुन्हा आपल्या बालपणाशी, निसर्गाशी आणि स्वतशी जोडून जाते.
कदाचित या आठ दिवसांची खरी कमाई हीच असेल!























































