
बलुचिस्तानमध्ये बंडखोर संघटनांनी पाकिस्तानी लष्कराविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत जोरदार हल्ले चढवले असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएने संपूर्ण प्रांतात केलेल्या मालिकाबद्ध हल्ल्यांमध्ये 20 पाकिस्तानी सैनिक आणि कथित एजंटांना ठार केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 21 नोव्हेंबर रोजी नुश्की येथील हजदा खोल भागातील पाकिस्तानी लष्कराच्या 93 विंग कॅम्पवर संघटनेचे हवाई पथक ‘QAHR’ आणि ‘फतेह स्क्वॉड’ने हल्ला चढवला. QAHR पथकाने हल्ल्याची सुरुवात केल्यानंतर सरमचारांच्या इतर तुकड्यांनी जड आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर करत सर्व बाजूंनी ताब्यात घेणाऱ्या सैन्यावर चौफेर हल्ला चढवला. या कारवाईदरम्यान QAHR या हवाई पथकाने लष्करी ठिकाणांना लक्ष्य करुन 11 ड्रोन हल्ले केले, ज्यात तळावरील आठ सैनिक ठार आणि सात जण जखमी झाले. या तळाच्या मदतीसाठी रेको आणि हारुनी येथून रवाना झालेल्या लष्करी ताफ्यांनाही लक्ष्य करण्यात आले असून, रेको येथे तीन सैनिक ठार आणि किमान चार जखमी झाले, तर हारुनी येथे बीएलएच्या स्नायपर्सनी केलेल्या हल्ल्यात शत्रूचे दोन सैनिक जागीच ठार झाल्याचे बलोच यांनी नमूद केले आहे.
बीएलएच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या लढवय्यांनी जरीन जंगलातील एक पूल उडवून दिला, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याला अनेक तास कुमक पाठवता आली नाही. या नुश्की कारवाईत एकूण 13 सैनिक ठार झाले आणि 11हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा या गटाने केला आहे. त्याच दिवशी मस्तुंगच्या गुरगिना भागातून पुढे सरकणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरही हल्ला करण्यात आला. आयईडी स्फोटानंतर तीन ठिकाणी झालेल्या सशस्त्र हल्ल्यात पाच जवान ठार झाले आणि इतर अनेक जखमी झाले, तसेच त्यांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. यावेळी बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर नागरी वस्त्यांवर मोर्टारने मारा केल्याचा आणि दुकाने जाळल्याचा आरोपही केला आहे.






























































