
तेलंगणातील विकाराबाद शहरात एका १७ वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदिनी असे या खेळाडूचे नाव असून, तिची नुकतीच बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील (U-19) महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. विकाराबाद येथील मधु कॉलनीतील आपल्या आजीच्या घरी तिने गळफास घेऊन जीवन संपवले. दोन तरुणांच्या सततच्या छळाला कंटाळून नंदिनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून, या घटनेमुळे स्थानिक क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
नंदिनी ही मूळची विकाराबाद जिल्ह्यातील यलाल मंडलातील संगायपल्ली गावची रहिवासी होती. शिक्षण आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती विकाराबादमध्ये आपल्या आजीकडे राहत होती. बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाल्याने तिने जिल्ह्याचे नाव उंचावले होते आणि तिच्या उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन तरुणांनी तिचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल प्रेमाच्या नावाखाली नंदिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता, तर कृष्णा त्याला या कृत्यात मदत करत होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.




























































