तंजावरचे स्थलमहात्म्य – तंजावर मराठी लावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव

[email protected]

अठराव्या शतकात तंजावरच्या भूमीत पोहोचलेली मराठी लावणी  तेथील स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाली आणि तिने एक स्वतंत्र  सांगीतिक व साहित्यिक परंपरा निर्माण केली.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत लावणीला अनन्यसाधारण स्थान आहे. ठसकेबाज शब्दरचना, नादमय छंद, सवाल-जबाबाची रंगत, शृंगारिक भावविश्व आणि लोकजीवनाचे प्रत्ययकारी चित्रण यांमुळे लावणीने मराठी मनावर अनेक शतके अधिराज्य गाजवले आहे. मात्र मराठी लावणीचा प्रवास महाराष्ट्राच्या सीमांपुरता मर्यादित राहिला नाही. अठराव्या शतकात तंजावरच्या भूमीत पोहोचलेली मराठी लावणी  तेथील स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाली आणि तिने एक स्वतंत्र  सांगीतिक व साहित्यिक परंपरा निर्माण केली. या परंपरेचा मागोवा घेताना महाराष्ट्र आणि तामीळनाडू यांच्यातील ऐतिहासिक, भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांचे एक वेगळेच दर्शन घडते.

तंजावरमध्ये मराठी लावणीचा प्रसार नेमका कसा झाला, यासंदर्भात श्री. बी. एम्. सुंदरम् यांनी 24 डिसेंबर 1993 रोजी चेन्नईतील  त्यागराजनगर येथील फाइन आर्ट सोसायटीच्या जर्मन हॉलमध्ये ‘मराठी लावणीचे तामीळनाडूत आगमन’ या प्रात्यक्षिकयुक्त व्याख्यानातून एक रोचक कथा सांगितली होती. त्यांच्या कथनानुसार, रामेश्वराच्या  यात्रेला निघालेल्या तीन व्यक्तींना कोल्हापूरमध्ये एका लावणीकाराचा  परिचय झाला. त्याच्याकडून लावणीचे शिक्षण घेतल्यानंतर ते तंजावरला पोहोचले. तेथे सईद उमरसाहिब या व्यापाऱयाला लावणीची  विशेष आवड होती. या माध्यमातून अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करता  येईल, या जाणिवेतून पौराणिक कथांवर आधारित सवाल-जबाबाच्या लावण्या रचल्या गेल्या. सईद उमरसाहिब यांनी वेंकटराव यांना लावणी शिकविली. पुढे वेंकटराव, शिवराव, हिंजाराव आणि अण्णास्वामी यांनी ही परंपरा पुढे नेली, असे सांगितले जाते. या आख्यायिकेतील काही तपशीलांची ऐतिहासिक पडताळणी आवश्यक आहे. विशेषत ‘असामी’ या शब्दाचा अर्थ आसाममधील रहिवासी असा घेतल्यामुळे या कथेला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले असावे. त्यामुळे लावणीच्या स्थलांतराचा इतिहास समजून घेताना मौखिक परंपरा आणि उपलब्ध हस्तलिखित पुरावे यांचा तुलनात्मक अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात मोडी लिपीतील अनेक कागदपत्रे आणि लावण्यांची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. बंडगर, रामचंद्र, काशा हुसेनी, काशीनाथ, बाळा भैरव, धोंडी बापू यांसारख्या  शाहीरांच्या लावण्यांचाही हस्तलिखितांमध्ये समावेश आहे. सरस्वती महाल ग्रंथालयाने ‘तंजावर मराठी लावणी वाङ्मय’ या पुस्तकाच्या  माध्यमातून काही लावण्या प्रकाशित केल्या आहेत. दुसरे सरफोजीराजे यांनी 1813 आणि 1821 मध्ये वाराणसीची यात्रा केली. त्यांच्या यात्रेवर आधारित ‘त्रिस्थळी यात्रेच्या लावण्या’ ही रचना विशेष उल्लेखनीय आहे. तंजावरमध्ये लावणी केवळ मनोरंजनाचे साधन नव्हती, तर ती धार्मिक विचार, तीर्थयात्रा, सामाजिक व्यवहार आणि तत्कालीन जीवनशैली व्यक्त करणारे माध्यमही होती, हे स्पष्ट होते. कलगी-तुरा आणि सवाई-मौजा असे लावणीचे प्रकार येथे प्रचलित होते. सवाल-जबाबाच्या माध्यमातून तात्त्विक विचार मांडण्याची परंपराही विशेष महत्त्वाची होती.

तंजावरमधील लावणीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्यात घडलेले भाषिक संक्रमण. सुरुवातीला मराठी भाषेत आणि बाळबोध लिपीत लिहिल्या जाणाऱया लावण्यांमध्ये पुढे तमीळ शब्दांचा समावेश होऊ लागला. तमीळ भाषिक श्रोत्यांना आशय समजावा म्हणून काही रचनांमध्ये तमीळ ओळीही वापरल्या गेल्या. पुढे मराठी शब्दमिश्रित तमीळ लावण्या आणि पूर्णपणे तमीळ भाषेतील लावण्याही निर्माण झाल्या. या प्रक्रियेत लावणीच्या मूळ छंदाचे आणि सांगीतिक ढंगाचे आकर्षण कायम राहिले. मात्र तिच्या अभिव्यक्तीला स्थानिक भाषेचा आणि संस्कृतीचा स्पर्श मिळाला. तंजावरमधील मराठी भाषेचा प्रभाव कमी होत गेल्यानंतर तमीळ भाषेतील लावणीचे प्रमाण वाढले. या परिवर्तनातून लोककलेची अनुकूलनक्षमता आणि भाषिक देवाणघेवाणीचे सामर्थ्य दिसून येते. तंजावरमधील मराठी लावण्यांमध्ये पुण्याच्या बुधवार पेठेचा उल्लेख, कोल्हापूरचा संदर्भ, शिपाई जीवन, विवाहसंस्था, स्त्राr-पुरुषांचे भावविश्व आणि दैनंदिन व्यवहार यांचे चित्रण आढळते.

महाराष्ट्रातील लावणीप्रमाणेच तंजावरच्या लावण्यांमध्ये स्त्राrसौंदर्य,  नखरेल चाल, प्रेम, विरह आणि प्रणय यांचे प्रभावी वर्णन आढळते. ‘ही सुंदरा भासे जेवि इंदिरा’ अशा वर्णनांतून सौंदर्याचे पारंपरिक संकेत आणि काव्यात्मक अलंकार दिसतात. सासरी जाणाऱया स्त्राrच्या  मनातील हुरहुर व्यक्त करणाऱया रचनांतून भावनिक नात्यांची कोमलताही प्रकट होते. अशा लावण्या केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणी जपत नाहीत, तर तंजावरच्या लोकजीवनाचेही दर्शन घडवतात. तंजावर इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेल्यानंतर लावणीच्याही राजाश्रयाला धक्का बसला. तसेच मराठी वाचणारा श्रोतृवर्ग कमी होत गेल्याने लावणीच्या स्वरूपात आणि भाषेतही बदल झाले आणि  कालांतराने लावणीचा अस्त झाला. तंजावरमधील मराठी लावणीचा अभ्यास हा केवळ एका लोककलेचा इतिहास नाही. तो स्थलांतर, राजाश्रय, भाषिक सहअस्तित्व आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा अभ्यास आहे.

महाराष्ट्रातून निघालेली लावणी तामीळनाडूत पोहोचली, स्थानिक भाषेशी एकरूप झाली आणि नव्या रूपात फुलली. लोककलेला भाषा, राज्य या सीमांमध्ये बंदिस्त करता येत नाही तर ती लोकांच्या स्मृती, आवड आणि सर्जनशीलतेच्या बळावर नवनव्या संस्कृतींमध्ये आपले घर निर्माण करते. अशा अनमोल लोककलेचे संशोधन करणे, हस्तलिखितांचे संपादन करणे, ध्वनिमुद्रण करणे आणि नव्या पिढीपर्यंत सादरीकरणाच्या माध्यमातून जतन करणे ही आधुनिक काळाची गरज आहे.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती,

साहित्य याचे अभ्यासक आहेत.)