
देशात जुलैपासून ऑगस्टपर्यंत पावसाने चांगलीच दमछाक उडवली असून, अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशात यावर्षी दोनशे जणांचा बळी गेला असून, साडेपाचशे रस्ते बंद झाले. दुसरीकडे कश्मीर, उत्तराखंडात पावसाचे धुमशान पहायला मिळत आहे. उत्तराखंडच्या पिथोरागड येथे पावसामुळे धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यावर भूस्खलन झाल्याने 19 कर्मचारी आत अडकले होते. यापैकी 8 जणांना वाचविण्यात आले असून, 11 जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
केंद्रीय हवामान विभागाने (आयएमडी) पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कायम राहणार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये उत्तराखंडात पूर आणि भूस्खलनाचा धोका जास्त आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अनेक राज्यांत पावसाचे प्रमाण चिंताजनक असल्याने एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक मदतकार्य पथके तैनात केली आहेत. राजधानी दिल्लीसह राजस्थान आणि हरयाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त म्हणजेच 167.9 मिमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.