गोव्यात बीचवर विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक

39

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यातील बागा बीचवर एका १६ वर्षांच्या मुलीची छेडछाड आणि विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील अकरा तरुणांना अटक केली. आरोपींमध्ये दोघेजण अल्पवयीन असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. कलंगुट पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील हे अकरा पर्यटक गोव्यातून पळून जाण्याआधीच त्यांना अटक केली अशी माहिती कलंगुट पोलिसांनी दिली. बागा बीचवर ही १६ वर्षांची मुलगी आपल्या १७ वर्षांच्या भावासह बसली होती. तिथे आईवडील जवळच्या एका स्टॅलवर नाश्ता करत होते. त्यावेळी ११ जणांचे टोळके तिथे आले आणि मुलीचा विनयभंग केला. मुलीचे फोटो काढले. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या भावाने विरोध केला असता सदर टोळक्याने त्याला मारहाण केली. पीडित मुलीने कुटुंबासह पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने ११ जणांना अटक केली. यातील दोघेजण १७ आणि १६ वर्षांचे आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांनी सांगितले. ज्या मोबाईलमधून मुलीचे फोटो काढण्यात आले तो मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या