केदारनाथमध्ये रायगडातील 10 भाविक अडकले, महाराष्ट्रातील 120 जणांचा समावेश

केदारनाथमध्ये दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 भाविक अडकले आहेत. त्यापैकी 10 भाविक हे रायगड जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड येथून संदीप झानजे यांच्यासह 10 जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेला होता. त्यापैकी 8 जण हरिद्वार येथे सुखरूप पोहाचले आहेत. गोपाळ पांडुरंग मोरे आणि सुदाम राजाराम मोरे हे केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅड येथे अडकले आहेत. त्यांचे समवेत महाराष्ट्रातील इतर साधारण 120 भाविक तिथे अडकले आहेत. हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंना हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करता येत नाही. सर्व जण सुरक्षित असून टप्या टप्याने यात्रेकरूंना खाली सोडत आहेत. महाराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला आहे.