1 हजार 200 पालघरवासीयांना सिकलसेल, अनुवंशिक रक्त विकाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम

पालघर जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमिया या आजाराचे 1 हजार 200 रुग्ण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ‘अरुणोदय-सिकलसेल अॅनिमिया’ ही विशेष मोहीम सुरू केली असून आरोग्य कर्मचारी संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत. या मोहिमेत सुमारे चार लाख नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे. आजाराच्या निदानानुसार नागरिकांना विशेष रंगाची ओळखपत्रे दिली जाणार आहेत.

पालघर जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल अॅनिमिया या गंभीर व अनुवंशिक रक्तविकाराचा प्रसार रोखण्यासाठी 15 जानेवारीपासून विशेष अभियान सुरू केले असून हे अभियान 7फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अभियानात सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड, सिकलसेल वाहकांना पिवळे कार्ड तर सिकलसेल मुक्त नागरिकांना सफेत कार्ड दिले जाणार आहे. यासोबतच रुग्ण, वाहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 224 सिकलसेल रुग्ण असून 1३ हजार 96 नागरिक सिकलसेलचे वाहक (कॅरियर) असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या रुग्णांना आवश्यक औषधोपचार व मार्गदर्शन दिले जात आहे.

– सिकलसेल हा अनुवंशिक आणि गंभीर स्वरूपाचा रक्ताचा आजार असून त्याची वेळेवर ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे.

– या आजारात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, भूक न लागणे, हातापायांवर सूज येणे, सांधेदुखी, तीव्र वेदना, लवकर थकवा येणे आणि चेहरा निस्तेज दिसणे अशी लक्षणे आढळून येतात.

– आतापर्यंत जिल्ह्यातील आश्रम शाळा व जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 60 टक्के विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
– उर्वरित विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी या अभियानादरम्यान केली जाणार आहे.