
मेट्रोसह अन्य प्रकल्पांच्या नावाखाली ठाण्यात तब्बल 13 हजार झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा भंडाफोड पर्यावरणप्रेमींनी केला आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी तसेच पालिकेच्या या भयंकर कारभारामुळे शहराच्या फुप्फुसावरच घाला पडणार आहे. दिवसेंदिवस तापमान आणि प्रदूषणात वाढ होत असताना झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा घाट घातल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत ठाण्यात झपाट्याने नागरीकरण गाढले असल्याने गर्दी, वाहतूककोंडीसारखी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोजची कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो प्रकल्प, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग, आनंदनगर-साकेत उन्नत मार्ग, घोडबंदर येथील रस्त्याचे रुंदीकरण अशा विविध प्रकल्पांची कामे जोरात सुरू आहेत. या विविध विकासकामांसाठी वृक्षांवर नोटीस चिटकवण्यात आल्या असून एका रात्रीत हजारो वृक्षांची कत्तल केली जात आहे. दरम्यान, एकीकडे वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र झाडांचे पुनर्रोपण नक्की केले जाते का? ही झाडे पुनर्रोपण केल्यानंतर जगतात का? याकडे पर्यावरणप्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वर्तुळाकार मेट्रो हवी तरी कशाला?
ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पात तब्बल तीन हजारांहून अधिक झाडांवर कुन्हाड चालविली जाणार आहे. उपवन, घोडचंदर, राबोडी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर या भागातील झाडे तोडली जाणार आहेत. यामध्ये आंबा, पिंपळ, वड, जांभूळ यासारख्या अनेक झाडांचा सामावेश आहे, तर 519 झाडे कायमस्वरूपी तोडले जाणार आहेत. दरम्यान, वर्तुळाकार मेट्रो हवी तरी कशाला? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
किती झाडांवर कुऱ्हाड?
खारेगाव-गायमुख खाडीकिनारा 309
बुलेट ट्रेनसाठी 770
मनोरुग्णालय इमारत 303
पालिकेचे नवे मुख्यालय 674
उन्नत मार्गिकेसाठी 315
ठाणे बोरिवली भुयारी मार्ग 30
विविध विकासकामांसाठी 13 हजार झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे समोर आले आहे. अशाच पद्धतीने वृक्षतोड सुरू राहिल्यास भविष्यात जगणे कठीण होणार असल्याची चिंता भासवते. याप्रकरणी शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी ठाणे महापालिकेच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत. त्यादृष्टीने तयारी केली आहे.
– रोहित जोशी (पर्यावरणप्रेमी)





























































