आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका गावात भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या विषबाधेमुळे आणखी 11 जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी अनेकांना अचानक उलट्या, तीव्र पोटदुखी आणि मूत्रमार्गात अडथळा निर्माण होण्यासारख्या गंभीर आरोग्य समस्या जाणवू लागल्या. या सर्वांनी एकाच दूध पुरवठादाराकडून दूध खरेदी केले असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अन्न सुरक्षा विभागाने तातडीने संबंधित डेअरी युनिटची तपासणी केली आहे. प्रशासनाने तेथील दूध आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी संबंधित दूध पुरवठादाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.