डबल इंजिन सरकारचा डबल पराभव! विधान परिषद निवडणुकीतील निकालांवरून अखिलेश यादवांचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने दोन्ही जागा जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी भाजपच्या कामगिरीची खिल्ली उडवत याला ‘डबल इंजिन सरकारचा डबल पराभव’ असे म्हटले आहे.

यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ११ जागांपैकी भाजपने ६ तर समाजवादी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाराणसीमधील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत समाजवादी पक्षाने भाजपचा धुव्वा उडवला. या विजयानंतर अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करत “डबल इंजिनचा डबल झिरो!” अशा शब्दांत भाजपला टोला लगावला.

अखिलेश यादव यांनी भाजपवर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचा आणि प्रशासनावर दबाव आणल्याचा गंभीर आरोपही केला. ते म्हणाले की, वाराणसीमध्ये भाजपचा पराभव राष्ट्रीय बातमी बनू नये यासाठी मतमोजणी संथ गतीने करण्याचे आणि थांबवण्याचे षडयंत्र दिल्ली आणि लखनौवरून रचले गेले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना हरवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रांवर ठेवलेल्या खड्या पहाऱ्यामुळे भाजपचा हा डाव उधळला गेला, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानताना अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगही फुंकले. “आमच्या कार्यकर्त्यांची हीच जागरूकता आणि एकजूट आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार स्थापन करण्यासाठी निर्णायक पाया बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.