ओडीशात मुसळधार पावाचा कहर! कंधमाल जिल्ह्यात भूस्खलनामुळे 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ओडीशाच्या कंधंमाल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण भूस्खलनाने एकाच कुटुंबातील तीनजणांचा बळी घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रायकिया ब्लॉकच्या डांगेसे गावात झालेल्या या दुर्घटनेत 9 महिन्यांच्या चिमुकल्या बाळासह त्याच्या आई-वडिलांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अचानक ओढवलेल्या संकटामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनाचा तडाखा बसून हे कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर दोन जणांना सुखरूप बाहेर काढले असून बाधित परिसरात सध्या मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पंचायत राज मंत्री आणि कंधमाल जिल्ह्याचे प्रभारी रवी नारायण नायक यांनी रायकिया येथील भूस्खलनग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट दिली. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या तिन्ही दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर करण्यात आली आहे.