लेन्स-आय – एका दवबिंदूत उमटलेलं विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राखी अरदकर, [email protected]

निसर्गातील सौंदर्य अनेकदा अगदी छोटय़ा गोष्टींतून आपल्यासमोर उलगडतं. एखाद्या पानावर विसावलेला दवबिंदू, फुलावर पडलेली प्रकाशाची तिरीप किंवा हिरवाईत उमटलेली एखादी नाजूक रंगछटा मनाला क्षणभर थांबवते. छायाचित्रणाच्या निमित्ताने निसर्गाकडे पाहताना मला अनेकदा अशाच अनपेक्षित अनुभवांची भेट मिळते. त्या सकाळी एका दवबिंदूने मला असाच एक सुंदर अनुभव दिला.

आताच कुठे सूर्य उगवत होता. सकाळच्या कोवळ्या प्रकाशाने बाग हळूहळू उजळू लागली होती. झाडांच्या पानांवर अजूनही रात्रीची ओल टिकून होती. बागेत फिरता फिरता एका नाजूक फांदीवरील गुलाबी फुलाकडे लक्ष गेलं. फुलाच्या वेलीच्या  टोकाशी विसावलेला तो पारदर्शक दवबिंदू… जणू निसर्गाने जपून ठेवलेला एखादा लहानसा मोती! उगवत्या सूर्याची किरणं त्याच्या पृष्ठभागावर पडत होती. त्या थेंबात प्रकाश चमकत होता आणि आजूबाजूच्या हिरवाईचं प्रतिबिंबही अलगद उमटत होतं. क्षणभर असं वाटलं, जणू एका थेंबाने अख्ख्या सकाळचं सौंदर्य स्वतःमध्ये सामावून घेतलं आहे.

मी रोज छायाचित्रं काढते.  प्रत्येक वेळी कॅमेऱ्यात काहीतरी वेगळं टिपता येईलच असं नाही. कधी एखादी रंगछटा, कधी प्रकाशाची दिशा, तर कधी एखाद्या आकाराभोवती निर्माण झालेली नाजूक जागा नवं काहीतरी दाखवून जाते. आज या दवबिंदूने मला पुन्हा एकदा थांबायला शिकवलं. कॅमेऱ्याच्या चौकटीत दृश्य सामावून घेण्यापूर्वी मनाच्या चौकटीत ते अनुभवणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव झाली.

निसर्ग मला नेहमीच नव्याने पाहायला शिकवतो. परिचित फुलेही प्रकाश बदलला की, वेगळी दिसतात. तोच दवबिंदू क्षणाक्षणाला रंग, आकार आणि चमक यांचं नवं रूप दाखवतो. छायाचित्रणातलं खरं नावीन्य कदाचित याच अनुभवात दडलं आहे. दृश्य समोर असतं, पण त्यातलं अद्भुत शोधण्यासाठी नजर संवेदनशील व्हावी लागते. त्या सकाळी मी एक दवबिंदू टिपला. त्यातून मिळालेला अनुभव, निसर्गाचं सौंदर्य  टिपलंच होतं आणि ते मनात उतरवून अनुभवलेलंही होतं .