जुलाब झाल्यानंतर केळीपासून मूगडाळ खिचडीपर्यंत आहारात काय समाविष्ट करायला हवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डायरिया किंवा जुलाब झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. वारंवार शौचास जावे लागत असल्याने अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. अशा वेळी औषधोपचारांसोबत आहाराकडे लक्ष देणेही महत्त्वाचे असते. पचनसंस्थेवर ताण न देणारे आणि सहज पचणारे पदार्थ खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते. तज्ज्ञांनी अशा पाच पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

केळी : केळ्यामध्ये विद्राव्य फायबर असते. त्यातील पेक्टिनमुळे मलाला घट्टपणा येण्यास मदत होते. याशिवाय केळ्यामधून पोटॅशियम मिळते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

साधा भात : जुलाब होत असताना साधा, मऊ भात खाणे फायदेशीर ठरते. भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने तो सहज पचतो. त्यामुळे आतड्यांना त्रास न होता शरीराला ऊर्जा मिळते.

दही : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच उपयुक्त जिवाणू असतात. हे आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करतात. मात्र, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे त्रास होत असल्यास दही खाणे टाळावे. दह्यामध्ये साखर किंवा कृत्रिम गोड पदार्थ मिसळू नयेत.

नारळपाणी : जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. नारळपाण्यात पोटॅशियम असल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यास मदत होते. मात्र, तीव्र डायरियामध्ये नारळपाणी हे ओआरएसचा पर्याय ठरू शकत नाही.

मूगडाळीची खिचडी : मूगडाळ आणि तांदूळ यांपासून तयार केलेली मऊ खिचडी सहज पचते. यातून कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मिळतात. पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण न देता शरीराला पोषण मिळते.

काय खाणे टाळावे?

जुलाब होत असताना तळलेले, अतिमसालेदार पदार्थ, जास्त तेलकट अन्न आणि पचनास जड पदार्थ खाणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस घेणे महत्त्वाचे आहे. जुलाब दीर्घकाळ सुरू राहिल्यास किंवा तीव्र अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.