IIT बॉम्बे साहिल वाकोडे प्रकरण; पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय तपासाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. साहिलच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी सीबीआय किंवा विशेष तपास पथकाद्वारे सोपवण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात नाही, तसेच साहिलला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला होता, असा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.

वाकोडे दाम्पत्याने ‘अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा’ अंतर्गत खटले चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयातही एक अर्ज दाखल केला आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी विनंती या अर्जात केली आहे.

जातीय भेदभावातून झालेल्या अपमानामुळे साहिलने आत्महत्या केल्याचा दावा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणीसाठी उल्लेख (मेंशनिंग) होण्याची शक्यता आहे.