
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर आता शिवभक्तांना रोप वे ने जाता येणार आहे. दुरुस्तीची मोहीम फत्ते झाल्याने आजपासून हा रोप वे सुरू झाला असून वृद्ध, दिव्यांग व महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ७६० मीटर लांबीचा प्रवास फक्त चार मिनिटांत करता येईल. रोप वे सुरू झाल्यामुळे पर्यटकांची दिवाळी गोड होणार आहे.
देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रोप वे २१ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हा रोप वे शिवभक्तांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी दिली. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभराच्या विविध भागांतून पर्यटक आणि शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यासाठी येत असतात. आता दिवाळीच्या सुट्टीतही पर्यटकांची गर्दी होणार असल्याने रोप वेमुळे अत्यंत कमी वेळेत रायगड किल्ल्यावर जाणे शक्य होणार आहे.
तिकीट ३२५ रुपये
रायगड किल्ल्याच्या १ हजार ७३७ पायऱ्या असून त्या चढण्यासाठी किमान दोन्हीं ते अडीच तासांचा कालावधी लागतो. रोप वेमुळे हे अंतर फक्त चार मिनिटांत पार करता येईल. ७५० मीटरची केबल टाकण्यात आली असून रायगड रोप वे प्रा. लि. मार्फत रोप वे चालवला जातो. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या रोप वेने प्रवास करता येतो. त्याचा परतीसह तिकीट दर ३२५ रुपये व ज्येष्ठ नागरिकांसाठी २२५ रुपये इतка आहे.





























































