
<< वैश्विक
[email protected]
शोधा म्हणजे सापडेल, हे संशोधनाचं सूत्र असतं. माणसाने अवकाशात पाठवलेल्या अनेक दुर्बिणींच्या तीक्ष्ण नजरेने गेल्या पाव शतकात विश्वातील अनेक आणि आतापर्यंत अगम्य असलेल्या गोष्टींचा शोध लावलाय. ही ‘डिस्कव्हरी’ आहे. म्हणजे या अवकाशीय वस्तू तेथे कोट्यवधी वर्षांपासून आहेतच, मात्र त्यांचा ‘पत्ता’ आपल्याला आता कळतोय. त्याचबरोबर, पृथ्वीवरून संशोधन करणारेही अवकाशाचा क्षणोक्षणी धांडोळा घेतायत.
अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेचे सहप्राध्यापक केविन बर्ज आणि विद्यार्थी ऍरन हाऊसहोल्ड यांनी वृषभ राशी तारकासमूहात दिसणाऱ्या, परंतु आपल्या आकाशगंगेपासून (मिल्की-वेपासून) 300 प्रकाशवर्षे दूरवर असणाऱ्या एका जोडताऱ्यांची ‘गंमत’ शोधलीय. आता ही ‘गंमत’ हा वैश्विक उलथापालथींचाच एक भाग आहे.
त्यानी शोधलेल्या ताऱ्यांच्या जोडगोळीत (द्वैती) किंवा बायनरी सिस्टममध्ये एक आहे रेड ड्वार्फ (रक्तखुजा) आणि दुसरा आहे ब्राऊन ड्वार्फ (तपकिरी खुजा) असे हे दोन तारे अवघ्या 87 मिनिटांत वेगाने परस्परांभोवती फिरतायत… आणि विशेष म्हणजे, दोन ‘खुज्या’मधला मोठा खुजा धाकट्याला चक्क खातोय! किंवा त्याचं ‘खाद्यं’च त्याच्याभोवती ‘मला खा’ म्हणत फिरतंय. आहे ना अमेझिंग!
त्यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी द्वैती आणि खुज्या ताऱ्यांविषयी थोडं जाणून घेऊ. द्वैती तारे म्हणजे काय? तर आधी उल्लेख केल्यानुसार ताऱ्यांची जोडगोळी. कधी ते ‘त्रैती’ किंवा ‘तिळ्या’च्या स्वरूपातही असू शकतात. सूर्याला सर्वात जवळ असलेला अल्फा सेन्टॉरी किंवा ‘मित्र’तारा हे तीन ताऱ्यांचे म्हणजे ‘त्रिकूट’ आहे. एकट्यादुकट्या ताऱ्याचे वस्तुमान काढणे अवघड जाते तसे द्वैती (बायनरी) ताऱ्यांच्या बाबतीत होत नाही. आपल्या आकाशगंगेतील 150 ते 200 अब्ज ताऱ्यांपैकी सुमारे 50 ते 80 टक्के तारे द्वैती असल्याचं म्हटलं जातं.
इतक्या संख्येने असणाऱ्या सर्वच ताऱ्यांचं स्वरूप सारखं नाही. यातले काही आभासी द्वैती असतात. याचा अर्थ ते दुरून फारच जवळ दिसतात आणि द्वैती असल्यासारखे वाटतात. पण प्रत्यक्षात तसे नसतात. असे तारे आपल्या दृष्टीरेषेत जवळ असल्याने ते द्वैती असल्याचा भास होतो. मात्र त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. दुसऱया प्रकारचे असतात ते ‘दृश्य द्वैती’ एकमेकांभोवतीच फिरतात. त्यांचे बॅरिसेन्टर (गुरुत्वीय केंद्र) एकच असते. चांगल्या दुर्बिणीतून त्यांची विलगता स्पष्ट दिसते. काही तारे दुर्बिणीतून ‘एकल’ आहेत असे वाटले तरी त्याच्या वर्णपटातील (स्पेक्ट्रममधील) हेलकावे लक्षात घेता त्याला साथीदार असल्याचे दिसते. असे तारे त्यांच्या गुरुत्वीय केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षांमधून फिरत असतात. त्यांचे वर्णपटीय आंदोलन (लंबकाप्रमाणे) लाल ते निळ्या रंगांमध्ये होते.
ऍस्ट्रोमेट्रिक नावाचेही ‘द्वैती’ तारे असतात. दुर्बिणीतही आधी एकच वाटलेल्या ताऱ्याची चाल ‘नागमोडी’ (झिगझिग) असेल तर त्याला जोडीदार असल्याचे सिद्ध करता येते. काही द्वैती तारे परस्परांना ‘ग्रहण’ लावतात. त्यांना एक्लिप्सिंग बायनरी म्हणतात.
आपण सुरुवातीला ज्या ‘खादाड’ ताऱ्याचा उल्लेख वाचला तशा रक्तवर्णी खुज्या ताऱ्यांचे प्रमाण संपूर्ण विश्वातील ताऱ्यांच्या प्रकारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्याजवळच्या सुमारे 70 ताऱ्यांपैकी 50 रक्तवर्णी खुजे (रेड ड्वार्फ) आहेत! या ताऱ्यांचे वस्तुमान सौर वस्तुमानाच्या एक दशांश असते. त्यातील गाभ्यातील ‘अणुभट्टी’ मंद तेवत असते. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमीच असते. असा तारा त्याच्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करू शकत नाही.
आपल्या लेखाच्या आरंभीचा रेड ड्वार्फ कसा आहे हे जाणल्यावर तो ‘खात’ असलेल्या तपकिती-खुजाचे स्वरूप कसे असते ते पाहू. हे खुजे तारे ग्रहांपेक्षा बरेच मोठे असतात. परंतु ‘तारा’ म्हणण्याला ‘लायक’ वस्तुमान त्यांच्याकडे नसतं आणि त्यामुळे त्यांच्या गाभ्यात आण्विक ऊर्जा (अणुभट्टी) प्रज्वलित होत नाही. तसं घडायला त्या ताऱ्याचं वस्तुमान, सूर्याच्या वस्तुमानाच्या किमान आठ-शतांश म्हणजे 0.08 इतके (तरी) असावेच लागते. तेच मुळात गुरूच्या वस्तुमानाच्या सत्तर पट आहे! सूर्याच्या वस्तुमानाच्या 0.03 वस्तुमान असलेल्या अवकाशी वस्तूला ‘ब्राऊन ड्वार्फ’ म्हणतात. त्यांची घनता मात्र गुरू ग्रहाच्या अनेक पट असल्याने त्याच्या गाभ्यात प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्यांच्या पृष्ठभागाचे तापमानही 750 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. गुरूचे उणे 175 अंश आहे.
‘खादाड’ रेड ड्वार्फ ज्या छोट्या ब्राऊन ड्वार्फला खातोय त्याला त्याने पूर्णपणे ‘गट्टम’ करण्यासाठी अब्जावधी वर्षे लागतील. तो ‘पचला’ की या रेड ड्वार्फचे वस्तुमान वाढेल का? अजिबात नाही. उलट, आपल्या तपकिरी खुजा सहकाऱ्याला हा रेड ड्वार्फ ‘गिळत’ असला तरी त्याचं वस्तुमान हळूहळू घटतंय. तो क्षीण होतोय. त्यातच तो नष्ट होणार. पूर्ण तारा होणारच नाही. कदाचित या खादाडीपर्यंत त्याला जीवदान मिळेल इतकंच.























































