ठसा – वेद राही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिशय उत्तम अशी साहित्याची जाण आणि सातत्याने निर्मिती, हिंदी, उर्दू, डोगरी या भाषांवर विलक्षण प्रभुत्व आणि या सगळ्यांचा चित्रपट पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन आणि मालिकांचे दिग्दर्शन यात वापर करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अवलिया अथवा कलंदर म्हणजे वेद राही. एक अष्टपैलू, बहुपेडी असं हे व्यक्तिमत्त्व सतत नावीन्याचा ध्यास ठरणारं असं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात कश्मीरमध्ये जन्माला आलेल्या वेद राही यांचे वडील लाला मुल्कराज सराफ यांचे ‘रणबीर’ नामक वर्तमानपत्र होते. स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने त्यातील आशय आणि अभिव्यक्ती त्या स्वरूपात होती. घरातील अशा पोषक  वातावरणात वेद राही यांना लहानपणापासूनच लिखाणाची हौस निर्माण होणं स्वाभाविक होतं. सुरुवातीच्या काळात  त्यांनी उर्दूतून लिखाणास सुरुवात केली. सुरुवातीची काही वर्षे ते जम्मू आकाशवाणीच्या सेवेत होते. आकाशवाणी त्या काळातील महत्त्वाचं माध्यम होते.1958 मध्ये ते भारत  सरकारच्या ‘योजना’ मासिकाचे संपादक बनले आणि त्याच वर्षी ‘काले हाथ’ हा डोगरी भाषेतील त्यांचा पहिला लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला. याची त्या काळी समीक्षकांनी दखल घेतली.

वेद राही यांचा आत्मविश्वास वाढावा अशीच ही गोष्ट होती. त्यांनी हिंदी व डोगरी भाषेतून मोठय़ा प्रमाणावर लिखाण केले. डोगरी भाषेत त्यांच्या नावावर सात प्रसिद्ध कादंबऱया, तीन कथासंग्रह व एक डोगरी भाषेतील काव्यकथा एवढी ग्रंथसंपदा आहे. हिंदी व उर्दू भाषेतही त्यांनी अनेक कादंबऱया, कथासंग्रह व काव्यसंग्रह लिहिले. आपल्या प्रतिभा आणि अनुभव यांचा त्यांच्या लेखनात संगम दिसून आला. ‘काले हत्थे’, ‘आले’, ‘क्रॉस फायरिंग’ आदी प्रसिद्ध कथासंग्रह, ‘झाड़ू बेदी ते पत्तन’, ‘परेड’ , ‘टूटी हुई डोर’, ‘गर्म जून’ आदी त्यांच्या  कादंबऱया प्रसिद्ध आहेत. कश्मिरी संत-कवयित्रीच्या जीवनावर आधारित ‘लाल देड’ ही त्यांची कादंबरीही लोकप्रिय  ठरली. राही यांनी आपल्या अनेक कथा- कादंबऱयांमधून कश्मीर खोऱयातील निसर्गाचे सुंदर आणि तितकेच रौद्र, दोन्ही रूपांचे दर्शन घडवले.

एकीकडे साहित्यिक म्हणून यशस्वी वाटचाल सुरू असतानाच वेद राही यांनी साठच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि त्यातही ते यशस्वी ठरले. विशेषतः सागर आर्टस् या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांनी वेद राही यांना चित्रपट या माध्यम आणि व्यवसायाची ओळख करून दिली. सतत नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असलेल्या वेद राही यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही लक्षवेधक कामगिरी केली. त्यामुळे ते सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे पटकथा लेखक म्हणून कार्यरत झाले. रामानंद सागर दिग्दर्शित ‘चरस’, सोहनलाल कवर दिग्दर्शित ‘बेइमान’, मोहनकुमार दिग्दर्शित ‘मोम की गुडिया’ आणि ‘आप आये बहार आयी’, राजेंद्र भाटिया दिग्दर्शित ‘पराया धन’ आणि ‘पवित्र पापी’, ब्रिज दिग्दर्शित ‘बहारे फिर भी आयेगी’ असे अनेक चित्रपट त्यांनी लिहिले. हे करत असतानाच वेद राही यांनी चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल टाकले  आणि नऊ चित्रपट दिग्दर्शित केले.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मालिकांचे युग सुरू झाले आणि वेद राही यांनी त्याही माध्यमातून आपल्या लेखन आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवला. ‘कथा सागर’,‘मीरा बाई’,‘रिश्ते’, ‘एहसास’, ‘जिंदगी’, ‘गुल गुलशन गुलफाम’ या मालिकांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. ‘गुल गुलशन गुलफाम’ ही मालिका कश्मीर खोऱयातील पार्श्वभूमीवर आधारित असल्याने त्यांनी त्यात विशेष रस घेतला. वेद राही यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर’ हा चरित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. हा चरित्रपट सुधीर फडके यांचे मोठे स्वप्न होते. प्लाझा चित्रपटगृहात या चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश संपादले.

‘आले’ या डोगरी भाषेतील कादंबरीने त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. जम्मू-कश्मीर सरकारने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीची दखल घेतली.

दिलीप ठाकूर

[email protected]