
फ्रान्स आणि इराण यांच्यातील राजकीय आणि कूटनीतिक तणाव आता टोकाला पोहोचला आहे. फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेटर सिस्टीमवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा गंभीर आरोप पॅरिसने केला आहे. फ्रान्सने याप्रकरणी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या सायबर युनिटवर ठपका ठेवत तेहरानला स्पष्ट इशारा दिला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत फ्रान्सची उघडपणे खिल्ली उडवली असून, जो देश साधी रेफ्रिजरेटर सिस्टीम सांभाळू शकत नाही, तो देश काय चालवणार? असा उपरोधिक सवाल केला आहे.
गेल्या महिन्यात 12 ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये एक मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे देशातील रेफ्रिजरेटरमधील तापमानात अचानक तीव्र वाढ झाली, ज्याचा थेट फटका फ्रान्समधील सुमारे 700 सुपरमार्केटना बसला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोई यांनी सोमवारी एका निवेदनात स्पष्ट केले की, या सायबर हल्ल्यामागे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचा (IRGC) थेट हात आहे. या अत्यंत गंभीर कृत्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी फ्रान्सने इराणच्या राजदूतांना तातडीने समन्स पाठवून बोलावले असून, तेहरानला या कृत्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बॅरोई यांनी दिला आहे. दुसरीकडे, पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या हल्ल्याशी संबंधित असलेल्या ‘शाहिद कावेह’ या कुख्यात सायबर युनिटच्या प्रमुखाविरुद्ध आणि त्याच्या दोन उपप्रमुखांविरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्याची अधिकृत विनंती केली आहे. पॅरिस येथे सुरू असलेल्या जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फ्रान्सच्या या आक्रमक भूमिकेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पॅरिसच्या आरोपांची जोरदार हवा काढली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, फ्रान्स सरकार स्वतःच्या देशातील नागरिकांच्या साध्या तक्रारींचे निवारण करणे तर दूरच, पण साधे रेफ्रिजरेटरसुद्धा सुरक्षित ठेवू शकत नाही. आता ते स्वतःच्या अकार्यक्षमतेचे आणि अपयशाचे खापर विनाकारण इतरांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. इराण नक्कीच एक शक्तिशाली देश आहे, परंतु फ्रान्ससारखा गाझामधील नरसंहाराला उघड पाठिंबा देऊन किंवा शाळा व रुग्णालयांवर बॉम्बहल्ले करून आम्ही आमची ताकद कधीही दाखवत नाही, असे म्हणत इराणने फ्रान्सच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.




























































