
ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासावर आज याचिकाकर्त्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मुख्य सूत्रधारांना जाणीवपूर्वक तपासाबाहेर ठेवले जात आहे. पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत. तपास यंत्रणा प्रत्येक वेळी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे कारण देत आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ आणि अन्य महत्त्वाचे धागेदोरे उपलब्ध करून दिल्यानंतरही त्यावर पुरेसा तपास केला जात नसल्याचा जोरदार युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.
प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असून हत्येचा कट रचणारे अद्याप मोकाट फिरत असल्याचा दावा करत तक्रारदार मंदार घोडके व प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी हायकोर्टात अॅड. समीर हाटले यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती अजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, मुख्य कट रचणाऱयांना जाणीवपूर्वक किंवा तपासातील अकार्यक्षमतेमुळे तपासाच्या कक्षेबाहेर ठेवले जात आहे. आरोपींची एका चहाच्या टपरीवर झालेली भेट सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून हे फुटेज 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी मिळवले होते, मात्र ‘महाराजा चाय’ येथील या फुटेजचा तपासाच्या रिमांड अहवालांमध्ये उल्लेखही नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. याचिकाकर्त्यांनी आरोपींच्या परस्पर संबंधांबाबत आणि गोळीबाराच्या सरावाच्या व्हिडीओंसह काही माहिती पोलिसांना दिली आहे. तसेच संबंधित ठिकाणांची माहिती, पेनड्राइव्ह आणि मोबाईलमधील चित्रीकरणही तपास यंत्रणेला उपलब्ध करून दिले. तरीही आरोपी सहकार्य करत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. अशा पद्धतीने तपास सुरू राहिल्यास तो पुढे जाणार नाही असा युक्तिवाद मुंदर्गी यांनी केला.
सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी
राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी तपासाची बाजू मांडताना सर्व व्हिडीओ आणि रेकॉर्डिंग न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. काही फुटेजचे अहवाल प्राप्त झाले असून ‘महाराजा चाय टपरी’वरील सीसीटीव्ही फुटेजही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. एका मोटरसायकलस्वाराच्या उपस्थितीवरूनही तपास सुरू असून संबंधित व्यक्ती घटनास्थळी होती की नाही हे ‘एफएसएल’च्या अहवालातून स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले. या युक्तिवादानंतर खंडपीठाने सुनावणी 2 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
























































