आयपीएलपूर्वीच ‘या’ युवा फलंदाजाचा धमाका; 27 षटकारांच्या जोरावर गोलंदाजांची अक्षरशः धुलाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये समीर रिझवीने उत्तर प्रदेशकडून खेळताना गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. समीर रिझवीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोठात आनंदाचे वातावरण आहे. समीर रिझवीने सयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 7 सामन्यांच्या 7 डावांमध्ये 79.50 च्या सरासरीने 178.65 च्या स्ट्राईक रेटने 318 धावा चोपून काढल्या आहेत. नॉन ओपनर फलंदाजांमध्ये समीर रिझवी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने संपूर्ण स्पर्धेत 27 षटकारांची बरसात करत 17 चौकार लगावले आहेत.

सयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये समीर रिझवीने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्याच हाच फॉर्म दिल्ली कॅपिटल्सला अपेक्षित असून त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सयद मुश्ताक अली ट्रॉफीचा विचार करता या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिझवी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिला क्रमांक पटकावलाय तो प्रियांश आर्य आणि यश धुल या दोघांनी. दोघांनीही संयुक्तपणे 418 धावा केल्या आहेत. समीरच्या खालोखाल अंकित राजेश कुमार ३१७ धावांसह चौथ्या आणि कोदीमेला हिमातेजा 315 धावांसह पाचव्या स्थानावर आहेत.

समीर रिझवीच्या आयपीएल आणि एकूण टी-20 कारकिर्दीवर नजर टाकल्यास, IPL 2026 त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून 11 सामन्यांच्या 9 डावांमध्ये 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या होत्या, ज्यात दोन अर्धशतकांचा (सर्वोच्च 90 धावा) समावेश होता. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीचा विचार करता त्याला 24 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र फलंदाजी फक्त १८ डावांमध्ये करता आली. या 18 डावांमध्ये त्याने 3 अर्धशतकांसह 424 धावा केल्या. याशिवाय, ऑक्टोबर 2022 मध्ये दिल्लीविरुद्ध टी-20 पदार्पण करणाऱ्या समीरने आतापर्यंत 58 टी-20 सामन्यांच्या 49 डावांमध्ये 37.83 च्या सरासरीने आणि 146.60 च्या स्ट्राईक रेटने 1362 धावा केल्या असून, त्यात 1 शतक (नाबाद 100 सर्वोच्च धावा) आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.