
लोकशाही दिन हा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या शासकीय व प्रशासकीय तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध असलेला महत्त्वाचा मंच आहे. मात्र अनेक नागरिकांना लोकशाही दिनाचे आयोजन कधी, कुठे केले जाते, तक्रार अर्ज कसा सादर करायचा, याबाबत पुरेशी माहिती नसल्याने या सुविधेचा अपेक्षित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात लोकशाही दिनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे निवेदन शिवसेनेने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले.
प्रत्येक महिन्यातील एक दिवस ठाणे जिल्हा प्रशासनाकडून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिनाच्या माध्यमातून सातबारा उतारा, फेरफार नोंदी, जमिनीचे सीमांकन, नामांतरण, अतिक्रमण हटविणे तसेच जात व उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब अशा विविध तक्रारी नागरिकांना मांडता येतात. त्याचप्रमाणे आवास योजना, शेतकरी कर्जमाफी, रोजगार हमी योजना आणि इतर वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचे प्रलंबित प्रस्ताव याबाबतही यंत्रणेकडे दाद मागता येते. मात्र लोकशाही दिनाची तारीख, वेळ, ठिकाण हेच नागरिकांना माहिती नसल्याने शासनाच्या उपक्रमाला हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लोकशाही दिनाची जनजागृती करा अशी मागणी विभागप्रमुख स्वप्नील शिरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या वेळी उपशाखाप्रमुख विजय कांगोरे, स्वप्नील शिरकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील झांजे आदी जण उपस्थित होते.



























































