अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नांबियार यांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या उल्हासनगरच्या डॉ. योगा नांबियार यांना प्रतिष्ठेचा ‘फोर्सेस फॉर गुड हिरोज अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. मुंबईत ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आदित्य बिर्ला समूहाच्या पुढाकाराने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनकडून डॉ. नांबियार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित माहितीपटही दाखविण्यात आला. डॉ. नांबियार या ग्लोबल राईट्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून त्यांनी उल्हासनगर, ठाणे आणि मुंबई परिसरातील तृतीयपंथीयांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी काम केले आहे. त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हक्कांचे संरक्षण आणि समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण समितीवरही त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत मिळालेल्या पुरस्कारामुळे उल्हासनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.