
>> प्रशांत गौतम
अशोक कोठावळे हे मॅजेस्टिक प्रकाशनाचे प्रकाशक, ललित मासिक आणि दीपावली वार्षिक दिवाळी अंकाचे संपादक आहेत. अलीकडेच त्यांची ‘सहवास प्रतिभावंताचा’ आणि ‘आठवणींची साठवण’ ही दोन पुस्तके त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाशित झाली.
माणसांच्या सहवासातून आयुष्य समृद्ध होत असते. काही माणसे आपल्या कामातून, स्वभावातून आणि विचारांतून मनावर कायमची छाप उमटवतात. अशा माणसांच्या सहवासातील आठवणी जपणे आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक काम आहे. अशोक कोठावळे यांच्या ‘सहवास प्रतिभावंतांचा’ आणि ‘आठवणींची साठवण’ या दोन पुस्तकांतून हेच काम अनुभवायला मिळते.
‘सहवास प्रतिभावंतांचा’ या पुस्तकात कोठावळे यांनी आपल्या आयुष्यात भेटलेल्या आणि सहवासातून जवळ आलेल्या विविध व्यक्तींची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ‘माझे आधारस्तंभ’, ‘पन्नास वर्षांचा ऋणानुबंध निखळला’, ‘रेगे काका’, ‘वडीलधारे लेखक’, ‘गुणी मित्र’, ‘जोगसर’, ‘आठवणीतील पिंगे’, ‘भेण्डे आणि मी’, ‘बोर्डेकर’, ‘नाना’, ‘चौघुले सर’, ‘बोलक्या अक्षरांचा धनी’, ‘अष्टपैलू लेखक’, ‘खोले सर’, ‘मित्रांच्या गोतावळ्यात रमणारा सन्मित्र’, ‘हरपलेले निमित्त ः दाजी पणशीकर’, ‘आमचे अण्णा’ आणि ‘करारी व यशस्वी हाताचे’ अशा प्रकरणांच्या शीर्षकातूनच या पुस्तकातील व्यक्तिवैविध्याची कल्पना येते.
या व्यक्ती केवळ साहित्य विश्वातील नामवंत म्हणून येथे येत नाहीत, तर त्यांच्याशी जोडलेले जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचे गुणविशेष आणि लेखकाच्या मनात जपलेल्या आठवणी यांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडते. या लेखनाला औपचारिक चरित्राचा साचा नाही. सहवासातून उमटलेले अनुभव आणि माणसाविषयीची आत्मीयता हे त्याचे बलस्थान आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्रातून साहित्य विश्वातील माणसांचे भावविश्व तर समजते, शिवाय त्या काळातील साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणाचीही ओळख होते.
दुसरे पुस्तक ‘आठवणींची साठवण’ हे अधिक आत्मपर स्वरूपाचे आहे. गिरणगावातील बालपण, गिरगावातील तरुणपण, लॉटरीची तिकिटे विकण्यापासून पुस्तक प्रकाशनापर्यंतचा प्रवास, मुद्रण तंत्रज्ञानात झालेले बदल, पुस्तक विक्रीच्या व्यवसायातील अनुभव, दुकानात येणारे ग्राहक आणि सोसायटीतील शेजारी अशा अनेक विषयांचा त्यात समावेश आहे. जुळलेल्या आणि न जुळलेल्या कुंडल्यांचे किस्से, श्रद्धा-अंधश्रद्धा आणि नास्तिकतेपासून माणुसकीच्या हरवत चाललेल्या मूल्यांपर्यंतचे निरीक्षण यांमधून लेखकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जाणवते.
या आठवणी केवळ वैयक्तिक अनुभव सांगत नाहीत. त्यातून एका काळाचा सामाजिक आणि सांस्कृतिक पट उभा राहतो. पुस्तकांच्या व्यवसायात चार दशके घालवताना आलेले अनुभव, प्रकाशन विश्वातील बदल, लेखक-वाचकांशी आलेले संबंध आणि पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेतील बारकावे यांनाही येथे स्थान मिळते.
या दोन्ही पुस्तकांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांतील अनुभवांची प्रामाणिकता आणि माणसाविषयीचा जिव्हाळा. एका पुस्तकात इतरांच्या सहवासातून घडलेल्या आठवणी आहेत, तर दुसऱयात स्वतच्या आयुष्याचा आणि व्यवसायाचा प्रवास आहे. त्यामुळे ही पुस्तके एकमेकांना पूरक ठरतात.
अशोक कोठावळे यांचा हा लेखनप्रपंच म्हणजे केवळ आठवणींचे संकलन नाही, तर मराठी साहित्यविश्व, प्रकाशन व्यवहार आणि बदलत्या सामाजिक जीवनाचा अनुभवाधारित दस्तऐवज आहे. काळाच्या ओघात विस्मृतीत जाणाऱया माणसांना, प्रसंगांना आणि अनुभवांना शब्दरूप देण्याचे महत्त्व या पुस्तकांतून अधोरेखित होते. म्हणूनच ही आठवणींची साठवण वाचकांसाठी आनंददायी ठरते आणि पुढील पिढय़ांसाठी मौल्यवान ठेवा बनते.
सहवास प्रतिभावंतांचा, आठवणींची साठवण
लेखक -अशोक कोठावळे
प्रकाशक- मॅजेस्टिक प्रकाशन
दोन्ही पुस्तकाचे मूल्य- 250/-



























































