नवलच! शतकी कासवाची करामत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण

विशाल पॅसिफिक महासागराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) भागातला इक्वेडोर नावाचा देश. तिथे अनेक बेटांचा समूह. त्यातलंच एक एस्पॅनोला नावाचं बेट. हे त्याचं अधिकृत नाव. लोकप्रिय नाव ‘हूड आयलॅन्ड‘ किंवा ‘हूड‘ बेट. त्या बेटावरचं तितकंच लोकप्रिय कासव म्हणजे डिअॅगो. ते सुमारे 110 ते 116 वर्षांचं आहे आणि ‘अजून यौवनात मी’ अशा स्थितीत आहे.

शतायुषी माणसांचं आपल्याला अप्रूप असतं. कारण एवढं जगणारी माणसं फारच कमी. सात अब्जांमध्ये ती काही हजारांतच भरतील, पण कासवांचं तसं नाही. सशाबरोबर शर्यत लावली तर ते त्या काल्पनिक गोष्टीत जसं ‘स्लो अॅन्ड स्टेडी’ म्हणजे हळू, पण सातत्य आणि चिकाटीने चालतं आणि ‘विन्स द रेस’ म्हणजे शर्यत जिंकतं. तसेच ते त्याच्या जीवनातही पाठीवरचं ढालीसारखं कठीण कवच सांभाळत संथगतीने सहज शंभरी पार करतं. काही कासवं तर तीन-चारशे वर्षे जगतात म्हणे, पण 1832 मध्ये नोंद झालेलं अधिकृत शतकोत्तरी कासव 194 वर्षांचे म्हणजे ‘डबल सेंच्युरी’कडे निघालेलं होतं. आपल्या देशातलं कोलकात्याचं ‘अद्वैत’ नावाचं कासव 2006 मध्ये कालवश झालं तेव्हा ते 255 वर्षांच होतं असं म्हटलं जातं.

आता ‘डिएगो’विषयी तेही कासवासारखंच, पण एका विशिष्ट प्रजातीचं कासव. ‘हूड‘ बेटावर त्याचा जन्म 1910 मध्ये झाला. पहिली 18 वर्षे ते तिथेच वाढलं. 1928 मध्ये त्याची रवानगी अमेरिकेतल्या प्राणिसंग्रहालयात झाली. इकडे हूड आयलँडवर शिकाऱयांची वक्रदृष्टी पडली आणि बघता-बघता या महाकाय (जायन्ट) कासवांची संख्या घटायला लागला. इतकी की,  1960 मध्ये या कासवांना नष्ट होणाऱया प्रजातींमध्ये समाविष्ट केलं गेलं.

त्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. त्या बेटावर फक्त तीन ‘मेल’ तर 12 ‘फिमेल’ उरल्या. त्यापैकी दोनच नर प्रजननक्षम होते. मग सॅन डिअॅगो येथील प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या ‘डिअॅगो’ला जोडीदारीण शोधण्यासाठी त्याची डीएनए चाचणी झाली. 1977 मध्ये तशा काही जणी मिळाल्या आणि तेव्हापासून ‘डिअॅगो’ सुमारे 900 बाल कासवांचा पिता झाला! 1977 ते 2020 या कालखंडातली ही कासव-प्रजा. याच काळात हूड आयलॅन्डवरही कासव-संवर्धन होऊन 2000 कासवं जन्माला आली होती. त्यामुळे 110 व्या वर्षी ‘डिआगो’ला निवृत्त करण्यात आलं. मात्र ज्ञात असलेया 900 कासवांचा जनक हे त्याचं बिरूद तो आजही मिरवतोय!