
> वर्णिका काकडे
नारायणपेठी बोली ही मराठीची एक वैशिष्टय़पूर्ण बोलीभाषा आहे, जी प्रामुख्याने विणकर (स्वकुळ साळी) समाजातील लोकांकडून बोलली जाते. ही बोली मूळच्या नारायणपेठ (सध्या तेलंगणा/आंध्र प्रदेश भागातील) आणि परिसराशी संबंधित असलेल्या विणकर समाजातील लोकांमध्ये घरगुती आणि सामाजिक स्तरावर जपली गेली आहे. हा विणकर समाज स्थलांतरित समाज समजला जातो. रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी महाराष्ट्रासह (मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव आदी विणकर केंद्रे) देशातील इतर राज्यांत स्थायिक झालेले लोक आजही आपल्या घरात ही बोली बोलतात.
पुण्यातील नारायण पेठेत बोलल्या जाणाऱया प्रमाण मराठीशी याचा थेट संबंध नाही; ‘नारायणपेठी बोली’ ही विणकर समाजाची स्वतंत्र बोलीभाषा मानली जाते. त्यामुळे नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे जितके खरे आहे तितकेच नारायण पेठी ही विशिष्ट समाजाची बोली आहे. विणकर समाजाच्या या बोली भाषेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा अशी स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, पैठण, येवला, नाशिक, अहमदाबाद, नवसारी, सुरत, आदोनी, बंगळुरू,, हुबळी, उज्जैन, इंदूर अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. आंध्र प्रदेशातील नारायण पेठ या गावी विणकर समाजाचे लोक जास्त प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यावरून या बोलीला हे नाव दिले गेले असावे. मात्र आता ज्येष्ठ पिढीशिवाय इतर वयात ही भाषा फारशी बोलली जात असल्याचे दिसून येत नाही.
ही बोली मराठी भाषेशी संबंधितच आहे. बोलण्यास सहज सुलभ, ऐकण्यास गोड वाटणारी ही बोली वैशिष्टय़पूर्ण आहे. या बोलीची लिपी देवनागरी असली तरी या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज उपलब्ध होणे दुर्मिळ आहे.
मराठी आणि नारायणपेठी बोलीतील शब्द पुढीलप्रमाणे
माझे – माझु, तुझे – तुझू, काय झाले? – का झालू? दुखते – दुखालै, बरे – बरू, बघ – देक, बोलावणे – बोलिला, मडके – मउकू, कोठून – कटून, देऊळ – गुडी, लहान – धकटू, सतरंजी – झमकाना, भाकरी – भक्कर
या बोलीतील काही वाक्ये – मी काम करतो – मी काम करतैय, ही आता आली – हिने आंता आली, तो घरी आला – तेने घरांन आला, मी घरी गेलो – मी घरांन गेलू
दर दहा कोसावर भाषा बदलते असे म्हटले जाते. या पद्धतीने नानाविध बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे.




























































