विकास दिसत का नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अजित रानडे

सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वेगाने वाढणाऱ्या आकडेवारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र वरकरणी भक्कम दिसत असले तरी सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन जगण्यातील आर्थिक अस्थिरता आणि तणाव कमी झालेला नाही. स्थिरावलेले वेतन, दर्जेदार रोजगार निर्मितीचा अभाव, शेअर बाजारातील निराशाजनक परतावा आणि आरोग्य-शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांवरील वाढता खासगी खर्च यामुळे सामान्य माणसाची क्रयशक्ती कमी कमी होत आहे. भारताचा विकास कागदावर वेगवान दिसत आहे. तरीही विकास दिसत का नाही? ‘विकासाची फळं गेली कुठे?’ हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाने 7.8 टक्के दराने वाढ नोंदवली होती. ती निश्चितच कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर संस्थांनी संपूर्ण वर्षासाठीच्या विकास दराचे अंदाज सुधारित केले आहेत. आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या काळातही वेगवान विकास टिकवून ठेवणे ही एक मोठी कामगिरी आहे. या लेखाचा विषय 7.8 टक्के विकास दराच्या आकडेवारीवरून निर्माण झालेला वाद नाही. ही आकडेवारी योग्य असल्याचे गृहीत धरूनच पुढील चर्चा केली आहे. मग सामान्य नागरिकांमधील नाराजी अवाजवी निराशावादातून निर्माण झाली आहे का? समृद्धी वाढली की, लोकांच्या अपेक्षाही वाढतात. कोणत्याही विस्तारत असलेल्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग अडचणीत असतात, तर काही नोकरीच्या शोधात असलेले तरुण निराश होतात. काही व्यक्तींशी झालेल्या चर्चेवरून भारतासारख्या मोठय़ा आणि विविधतेने नटलेल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करणारे चित्र उभे करता येत नाही. रिझर्व्ह बँकेच्या सप्टेंबरमधील नागरी ग्राहक विश्वास सर्वेक्षणातूनही ही बाब स्पष्ट होते. सध्याच्या आर्थिक परिस्थितीबाबतचा ग्राहक विश्वास निर्देशांक 87.9 वर आला. मार्च 2023 नंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. या निर्देशांकाची तटस्थ पातळी 100 आहे. सर्वेक्षणातील सुमारे 54.5 टक्के नागरिकांनी मागील वर्षाच्या तुलनेत देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचे मत नोंदवले. केवळ 25.3 टक्के नागरिकांना परिस्थितीत सुधारणा झाल्याचे वाटते.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया अधिक बोलक्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्न वाढल्याचे केवळ 20.6 टक्के ग्रामीण नागरिकांनी सांगितले, तर 30.5 टक्के नागरिकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले. त्यामुळे कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल व्यक्त होणारी अस्वस्थता केवळ काही व्यक्तींच्या अनुभवांवर किंवा राजकीय भाष्यांवर आधारित नाही. रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणातूनही त्याला आधार मिळतो. तथापि, या सर्वेक्षणातून सर्वत्र निराशेचे वातावरण असल्याचे दिसत नाही. शहरी कुटुंबांना आगामी वर्षाबाबत अजूनही आशावाद आहे. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असली तरी भविष्यात सुधारणा होण्याची अपेक्षा कायम आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात असल्याचे चित्र रंगवणेही चुकीचे ठरेल.

वेगवान आर्थिक विकास आणि सामान्य माणसाची आर्थिक अस्वस्थता यांत विरोधाभास असण्याची गरज नाही. सकल देशांतर्गत उत्पादन देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य मोजते. मात्र, या उत्पादन वाढीतून निर्माण झालेले उत्पन्न समाजातील विविध घटकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचले, रोजगार किती सुरक्षित आहेत किंवा पूर्वीइतके उत्पन्न मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती अधिक कष्ट करावे लागत आहेत, याची माहिती या आकडेवारीतून मिळत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या खोलीत कोटय़धीश व्यक्ती आली तर त्या खोलीतील प्रत्येक व्यक्तीची सरासरी संपत्ती लगेच वाढेल. मात्र आधीपासून खोलीत असलेल्या कोणाच्याही संपत्तीत प्रत्यक्ष वाढ झालेली नसेल. तशाच प्रकारे अगदी दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन, जे लोकसंख्येनुसार उत्पादनाचे समायोजन करते, तेदेखील सामान्य कुटुंबाच्या परिस्थितीत नेमके काय घडले हे उघड करू शकत नाही.

आर्थिक विकासाचे स्वरूपही महत्त्वाचे असते. भांडवलप्रधान उद्योग आणि विशेष कौशल्यावर आधारित सेवा क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणावर उत्पादन व उत्पन्न निर्माण होऊ शकते. मात्र या क्षेत्रांत तुलनेने कमी लोकांना थेट रोजगार मिळतो. कंपन्यांचा नफा ज्या वेगाने वाढतो त्या तुलनेत कर्मचाऱ्यांचे वेतन वाढत नाही. अलीकडच्या काळातही हेच चित्र दिसले आहे. विकासाचा लाभ प्रामुख्याने कंपन्या आणि भांडवलधारकांपर्यंत मर्यादित राहिला तर विविध कौशल्यांच्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या विकासाच्या तुलनेत त्याचा सामान्य नागरिकांवर कमी परिणाम जाणवतो. कंपन्यांचा नफा कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा कितीतरी वेगाने वाढू शकतो. अलीकडच्या काळात नेमके हेच घडले आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुर्वुरी सुब्बाराव यांनीही याच समस्यांकडे लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागातील वास्तविक वेतनवाढ कमकुवत राहणे आणि चांगल्या दर्जाच्या रोजगारांची पुरेशी निर्मिती न होणे या दोन प्रमुख अडचणी आहेत. पायाभूत सुविधा, बँकिंग आणि डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रांत भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. या उपलब्धींचे महत्त्व नाकारण्याचे कारण नाही. मात्र त्यांचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नसतील तर विकास सर्वसमावेशक ठरत नाही.
रोजगाराच्या आकडेवारीचा विचार करतानाही या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. टॅक्सी चालवणारी व्यक्ती, अधूनमधून बांधकामावर काम करणारा मजूर किंवा कुटुंबाच्या शेतीत हातभार लावणारा सदस्य यांची रोजगारित म्हणून नोंद होते. मात्र त्यातून त्यांचे उत्पन्न किती आहे, काम किती नियमित आहे, कामाचे तास किती आहेत किंवा आजारपणाच्या काळात त्यांना कोणते आर्थिक संरक्षण मिळते, याची माहिती मिळत नाही. पूर्वी 10 तास काम करून मिळणारे उत्पन्न आता 14 तास काम करूनही मिळत असेल तर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खालावली आहे. ही आर्थिक परिस्थितीतील घसरण आहे. मात्र, रोजगाराच्या आकडेवारीत त्याचे प्रतिबिंब उमटत नाही. सरकारी नोकऱ्यांसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा हीदेखील याच समस्येची खूण आहे. मर्यादित जागांसाठी हजारो उमेदवार अर्ज करतात. त्यामागे बेरोजगारी हे एक कारण आहेच; पण नियमित वेतन, भत्ते आणि नोकरीची सुरक्षितता यांचे आकर्षणही मोठे आहे.

उपलब्ध रोजगाराच्या पर्यायांबद्दल त्यांच्यात किती असमाधान आहे, हे त्यांच्या या प्रयत्नांतून दिसते. या पार्श्वभूमीवर तरुणांमधील अस्वस्थता समजून घ्यावी लागेल. कुटुंबांनी मोठा आर्थिक त्याग करून मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक केलेली असते. शिक्षणामुळे आर्थिक प्रगतीची आणि चांगल्या रोजगाराची अपेक्षा निर्माण होते. मात्र, पदव्या मिळूनही स्थिर रोजगार मिळत नसेल तर निराशा वाढणे स्वाभाविक आहे. परीक्षा पुढे ढकलणे आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना या असंतोषात आणखी भर घालतात. कुटुंबांच्या क्रयशक्तीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. अन्नधान्य, घरभाडे, मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा आणि प्रवास यांवरील खर्चातून सामान्य कुटुंब आपली आर्थिक स्थिती मोजते. महागाईचा दर कमी झाला म्हणजे वस्तूंच्या किमती पूर्वीच्या पातळीवर आल्या असा त्याचा अर्थ होत नाही.

कारण यापूर्वी झालेली दरवाढ कायम असते. त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ झाली नसेल तर महागाईचा दर काही काळ कमी राहूनही कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यांची परिस्थितीही याच दृष्टिकोनातून समजून घ्यावी लागेल. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. त्याच वेळी शेतीचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या मात्र कायम आहेत. शेअर बाजारातील परिस्थितीमुळे मध्यमवर्गीयांच्या आर्थिक मानसिकतेवरही परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये बाजारात तेजी आली असली तरी गेल्या दोन वर्षांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सातत्याने मोठय़ा प्रमाणावर पैसा काढला. त्याच काळात देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून दरमहा 30 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होत राहिली. या देशांतर्गत गुंतवणुकीमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले नाहीत.

अस्थिर वेतन, बेरोजगारी, वाढती महागाई, वाढते कौटुंबिक कर्ज आणि रस्ते, शाळा व पिण्याचे पाणी यांसारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सेवांची खालावलेली स्थिती यांमुळे जनतेत निराशा अधिकच वाढली आहे. उत्तम सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था यामुळे कुटुंबांना खासगीरीत्या करावा लागणारा खर्च कमी होऊन राहणीमान सुधारेल. चांगल्या दर्जाच्या नोकऱ्यांची वाढ अत्यंत मंद आहे. राष्ट्रीय उत्पादनासोबतच कमाई, संधी आणि दैनंदिन राहणीमान सुधारेल, तेव्हाच त्याचे यश अधिक व्यापकपणे जाणवेल.

 एक उबर चालक सांगतो की, तो पूर्वीपेक्षा जास्त तास काम करतो, तरीही त्याच्या हातात कमी पैसे उरतात. इंधन, देखभाल, कर्जाचे हप्ते आणि या तंत्रज्ञान मंचाची कपात वजा जाता त्याच्याकडे फारसे काहीच शिल्लक राहत नाही. त्याच्या या अनुभवावरून संपूर्ण अर्थव्यवस्था कशी काम करत आहे, याचा निष्कर्ष काढता येत नाही, परंतु त्यातून समोर येणारा प्रश्न रास्त आहे तो म्हणजे जर भारताचा विकास वेगाने होत असेल तर सर्वसामान्यांना, तळागाळातल्या लोकांना उदरनिर्वाह करणे अधिक कठीण का होत चालले आहे? यावरून ‘इफ लाईफ इज अ बोल ऑफ चेरीज, व्हॉट अॅम आय डुइंग इन द पिट्स?’ या एर्मा बॉम्बेक यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाची आठवण होते. एखादी अर्थव्यवस्था लवचिक आणि भक्कम असली तरीही ती अनेक लोकांना आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित ठेवू शकते.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत)
 thebillionpress.org