
माथेरानच्या निसर्गरम्य घाटात विकेंडचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या डोळ्यांसमोर रविवारी सकाळी थरारक घटना घडली. जुमापट्टी रेल्वे स्थानक परिसरात अचानक एक मारुती वॅगनआर कार थेट मिनी ट्रेनच्या रेल्वे रुळांवर कोसळली. विशेष म्हणजे, त्याचवेळी पर्यटकांनी खचाखच भरलेली मिनी ट्रेन स्थानकात उभी होती. कार रुळांवर पडल्याने रेल्वे वाहतूक काही काळ थांबवावी लागली. सुदैवाने कारमधील तीन तरुणी आणि दोन तरुण अशा पाचही जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची माथेरानकडे मोठी गर्दी होत असतानाच सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्जत तालुक्यातील भिवपुरी डीक्सल येथील कार चालक सूरज पटेल हा तरुण आपल्या मित्र-मैत्रिणींसह माथेरान घाटातील जुमापट्टी परिसरात थंडगार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आला होता. त्याने रेल्वे रुळांजवळील उंच मोकळ्या जागेत आपली कार पार्क केली होती.
दरम्यान, नेरळ येथून सकाळी 8.50 वाजता सुटलेली मिनी ट्रेन साडेनऊच्या सुमारास जुमापट्टी स्थानकात नेहमीप्रमाणे थांबली होती. विकेंड असल्याने ट्रेनमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. याचवेळी कार बंद पडल्याने सूरज पटेल आणि त्याचे साथीदार कारला धक्का देत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, धक्का देत असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मागे सरकत रेल्वे ट्रॅकवर कोसळली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे कर्मचारी, स्थानक मास्तर, नेरळ रेल्वे पोलीस तसेच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार बाजूला करून रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यात आला. त्यानंतर सुमारे पाच मिनिटे थांबलेली मिनी ट्रेन पर्यटकांना घेऊन माथेरानच्या दिशेने रवाना झाली. ट्रेनमधील पर्यटकांसह घाट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनीही हा थरार प्रत्यक्ष पाहिला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारमधील तरुण-तरुणी रात्रीपासूनच जुमापट्टी परिसरात होते. कारमधील तरुणी बदलापूर येथील, तर एक मित्र डोंबिवली येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी कारचालक सूरज पटेल याला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.
मिनी ट्रेनच्या दिशेने कार कोसळली असती तर…?
कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने काही मिनिटांसाठी मिनी ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, त्याचवेळी ट्रेन स्थानकात उभी असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. चालू ट्रेनच्या दिशेने ही कार कोसळली असती तर पर्यटकांच्या जीवावर बेतणारा गंभीर अपघात घडण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वे मार्गालगत वाहने पार्क करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस आणि रेल्वे पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.


























































