आभाळमाया – वैश्विक : बुधाजवळ जाताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

[email protected]

3 ऑक्टोबरच्या संध्याकाळी शुक्राची चकाकती ‘कोर’ पाहण्यासाठी जाताना सर्वांच्याच मनात शंका होती की पाऊस सरला असला तरी चार चुकाट ढग क्षितिजावर रेंगाळत असतातच. त्यातच प्रदूषणाची भर टेलिस्कोप पश्चिम क्षितिजाकडे रोखला तेव्हा अगदी अशीच स्थिती होती. त्यातच ‘वक्री’ झालेल्या शुक्राची कोर कशी दिसणार ही विवंचना होती. पण तो क्षितिजापासून चांगला 15 अंशांपर्यंत वर दिसत असल्याने विरळ ढगांमधूनही स्पष्ट दिसू लागला आणि त्याकडे दुर्बिण ‘पह्कस’ करताच त्याची मनोहारी ‘कला’ आणि ‘कोर’ही पाहायला मिळाली. याच वेळी एक ‘बोगस’ ग्रहदर्शन स्पष्टपणे झालं ते बुधाचं. दुर्बिणीतून तो अतिशय स्पष्ट दिसत होता. नुसत्या नजरेला मात्र बराच अंधुक… त्याचं कारणही तसंच आहे. बुध सूर्याजवळचा आपल्या ग्रहमालेतला पहिला ग्रह. त्यामुळे त्याचं सूर्यापासूनचं अंतर कमी आणि पृथ्वीपासून जास्त आहे. मधे शुक्र येतो. शिवाय बुधाचा आकारही लहान. त्यावर शुक्रासारखे सल्फर-कार्बनचे ढग नसल्याने सूर्यप्रकाश अधिकाधिक परावर्तित होऊन दृश्य ‘तेजस्विता’ वाढण्याचीही शक्यता नाही.

या अनेक कारणांमुळेच आम्हा खगोल अभ्यासकांसाठी बुध-दर्शन ही पर्वणी असते. पूर्वेला उगवून पूर्वेलाच मावळणारे आणि काही काळाने पश्चिमेला उगवून पश्चिमेलाच मावळणारे ग्रहमालेतले दोन ग्रह म्हणजे बुध आणि शुक्र… याचं कारण असं की ते सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येतात. म्हणून त्यांना पृथ्वीसापेक्ष ‘अंतर्ग्रह’ म्हटलं जातं.

आता थोड्याच काळापूर्वी छान बुधावलोकन झाल्याने त्याची माहिती आणि त्याच्याजवळ गेलेल्या एका यानाची माहिती घेऊ. हा सूर्यापासूनचा पहिला ग्रह 4880 किलोमीटर व्यासाचा आहे. गंमत म्हणजे त्याच्यावरचं पॅलोरीस प्लॅनेटिया हे विवर त्याच्या व्यासाच्या एक तृतीयांश म्हणजे 1550 किलोमीटर व्यासाचं आहे. तसा बुध दिसतो आपल्या चंद्रासारखाच तो सूर्याजवळ असताना 4 कोटी 60 लाख किलोमीटर तर दूर असताना 6 कोटी 98 लाख किलोमीटर अंतरावर असतो. बुध सूर्याभोवती अवघ्या 87 दिवसांत फिरतो. तो स्वतःभोवती इतक्या जोरात गरगरत असतो की आपल्या 24 तासांच्या एका दिवसात त्याचे 176 दिवस होतात! म्हणजे क्षणात उजेड क्षणात काळोख. आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो. सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून अधिक चांगला दिसतो. थॉमस हॅरियट आणि गॅलिलिओ यांनी 1609 मध्ये दुर्बिणीतून बघितला तेव्हापासून सतत त्याचं निरीक्षण जगात सर्वत्र केलं जातंय.

बुध आणि शुक्र हे पृथ्वीचे अंतर्गह असल्याने ते क्वचित प्रसंगी एकमेकांसमोर आलेले दिसतात. त्याला ‘पिधान’ पिंवा ‘ऑकल्टेशन’ म्हणतात. मात्र ही संधी अत्यंत दुर्मिळ असते. 28 मे 1737च्या रात्री अवकाशनिरीक्षकांना लाभली होती. आता तो योग 3 डिसेंबर 2133 रोजी येणार आहे. तोपर्यंत धीर धरायला हवा! 1987च्या नोव्हेंबरमध्ये सकाळी आम्ही बुधाचं सूर्यापुढून सरकणं म्हणजेच ‘ट्रान्झिट’ पाहिलं होतं.

बुधाकडे गेलेलं पहिलं मानवी यान म्हणजे ‘नासा’चं मरीनर-10. ते 1974-75मध्ये बुधाकडे पाठविण्यात आलं. त्याने प्रथमच बुधाचे जवळून पह्टो घेतले. 2004मध्ये ‘नासा’च्या ‘मेसेंजर’ने बुधाचा मागोवा घेतला. त्यानंतर अलीकडेच बुधाकडे गेलेलं यान म्हणजे बेपी-कोलंबो. 20 ऑक्टोबर 2018ला सोडलेलं हे यान 2025पर्यंत बुधाला फेऱ्या घालणार होतं. 2026ला बुधावरचा त्यांनी आपला अखेरचा प्रवास सुरू केला आहे.

बेपी-कोलंबो यान युरोपीय स्पेस एजन्सी आणि जपान एअरोस्पेस कॉर्पोरेशन यांचा संयुक्त प्रकल्प आहे. 3 सप्टेंबरला त्यावरच मर्क्युरी ट्रान्सफर मोडय़ुल वेगळं झालंय. बेपी-कोलंबो यानाने सुमारे 10 अब्ज किलोमीटर प्रवास करून बुध गाठला आहे. यातल्या ‘क्रुझर’ या प्रमुख यानाला ‘मर्क्युरी प्लेनेट ऑर्बिटर’ हे युरोपीय तर ‘मर्क्युरी मॅग्नोटोस्पिअर ऑर्बिटर’ हे जपानचं अशी दोन उपयानं जोडली गेली. आता ही जोडगोळी यशस्वीरित्या विभक्त झाली असून त्यांची बुधाच्या दिशेने शेवटची मार्गक्रमणा सुरू आहे. 10 डिसेंबरला ही दोन्ही याने आपापल्या कक्षेत स्थिरावतील. त्यानंतर मरीनर आणि मेसेंजर यांनी पाठविलेल्या माहितीपेक्षा बुधाची सखोल माहिती आपल्याला मिळू लागेल. 2029मध्ये या यानाचा कार्यकाळ संपेल. तोपर्यंत बुध आपल्याला बऱ्यापैकी समजलेला असेल.

बुध हा सूर्यापासून केवळ आठ कोटी किलोमीटर (पृथ्वीच्या साधारण निम्म्याने हे अंतर आहे) अंतरावर असल्याने सूर्याची दाहकता त्याला सर्वाधिक जाणवते. अशा ग्रहाच्या जवळ जाणाऱ्या यानांनाही हा सूर्य प्रकोप सहन करावा लागणारच. म्हणून बेपी-कोलंबो यानावर उष्णतारोधक मटेरियलचे 97थर चिकटवले आहेत. त्यातील प्रयोग करणारी सामग्री सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने हे अतिशय आवश्यक होते. गलोल पिंवा ‘स्लिंगशॉट’ पद्धतीने पृथ्वीभोवती एकदा, शुक्राभोवती दोनदा आणि बुधाभोवती सहा वेळा परिक्रमा करून त्याने ही गती प्राप्त करून घेतली. त्यातूनच आता बुध संशोधनाची प्रगती साधणार आहे.