लेख – सरदार पटेल-इंदिरा गांधी : कर्तृत्व आणि सामर्थ्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उल्हास पवार

देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री आणि ज्यांचा उल्लेख ‘लोहपुरुष’ असा केला जातो, ते ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. तसेच ‘आयर्न लेडी’ असे संबोधल्या जाणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी या दोघा महान नेत्यांचा कार्यकाळ वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख जर बघितला तर निश्चितपणे गंभीरपणा, निर्भीडपणा, धैर्य, आत्मबल आणि दुर्दम्य देशाभिमान या दोघांमध्येही दिसून येतो. देशामध्ये दोघांनीही सारखेच सामर्थ्य आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे.

भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी करून ब्रिटिशांनी सत्ता सोडली. मात्र देशातील सुमारे 565 संस्थानांना ब्रिटिशांनी भारतात राहायचे की पाकिस्तानात जायचे अथवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचे, यावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांनी यास कडाडून विरोध केला. एवढेच नव्हे तर ही संस्थाने भारतात खालसा व्हायला हवीत, हा पंडित नेहरूंचा दृष्टिकोन सरदार पटेलांनी तंतोतंत आणि कणखरपणे अमलात आणला. हैदराबाद, जुनागढ, भोपाळ, त्रावणकोर अशी संस्थाने विलीनीकरणास खळखळ करीत असताना वेळप्रसंगी लष्करी कारवाई करून त्यांनी ती भारतात विलीन करून घेतली. कश्मीरचे राजा हरिसिंह आणि अन्य संस्थानिकांशी मुत्सद्दीपणाने वाटाघाटी करून ते भागही भारतात समाविष्ट करून घेतले.

हाच कणखरपणा आणि देशप्रेम पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातही ठायीठायी दिसून येतो. 1966 मध्ये इंदिरा गांधी प्रथम पंतप्रधान झाल्या, तेव्हा अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. अमेरिकन मिलो, हलका गहू, तांबडी ज्वारी अमेरिकेकडून भारताला दिली जायची, पण निकृष्ट धान्यामुळे इंदिराजी अतिशय अस्वस्थ झाल्या आणि जागतिक कीर्तीचे कृषितज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्यावर ‘हरितक्रांती’ची जबाबदारी त्यांनी सोपविली आणि अवघ्या काही वर्षांतच देशाला त्यांनी अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले. प्रखर देशभक्ती हीच त्यांची यामागची प्रेरणा होती. त्यानंतर त्यांनी देशातील सर्व संस्थानिकांना मिळणारे तनखे बंद करून टाकले. या संस्थानिकांना लाईट बिल नाही, कोणताही कर नाही, केंद्राच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर खटला नाही, तसेच दरमहा विशिष्ट रक्कम या साऱया सवलती त्यांनी कणखरपणा दाखवून संपुष्टात आणल्या. याचबरोबर सर्वसामान्यांच्या हितासाठी त्याच कणखरपणे त्यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हाच्या जनसंघाने या दोन्ही निर्णयांना मोठा विरोध करून मूठभर संस्थानिक व भांडवलदारांचे हित सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदिराजी सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या बाजूने भक्कमपणे उभ्या राहिल्या.

1971 मध्ये पश्चिम पाकिस्तानच्या वर्चस्वामुळे व अत्याचारांमुळे पूर्व पाकिस्तानमधील जनता त्रस्त झाली असताना एक कोटीहून अधिक निर्वासित भारतात आले. त्या वेळीदेखील जागतिक पातळीवर मुत्सद्देगिरी करूनही पाकिस्तानला वेसण घातली जात नाही, हे लक्षात येताच इंदिरा गांधींनी पाकिस्तानी विमानांनी केलेल्या बॉम्बहल्ल्याचे निमित्त करून पूर्व पाकिस्तानात सैन्य घुसविण्याचा आदेश जनरल सॅम माणेकशॉ यांना देऊन अवघ्या 14 दिवसांत पाकिस्तानचा पूर्ण पराभव करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले व ‘बांगलादेश’ची घोषणा करून त्यास लगोलग मान्यताही दिली. दक्षिण आशिया खंडाचा भूगोल बदलण्याचे सामर्थ्य इंदिराजींमध्ये होते. त्या वेळी पाकिस्तानच्या बाजूने असणाऱया अमेरिकेने भारताविरुद्ध त्यांचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठविले तरी कणखर इंदिराजी तसूभरही डगमगल्या नाहीत आणि बांगलादेशची निर्मिती करूनच त्या थांबल्या.

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे देशप्रेम, धैर्य, दूरदृष्टी, कणखरपणा, निर्णय घेण्याची क्षमता व राबविण्याची धमक या आजच्या केंद्रातील सत्ताधाऱयांमध्ये अभावानेच दिसून येते. इंदिरा गांधींनी पहिला पोखरण अणुस्पह्ट करून देशाला अण्वस्त्र्ाधारी बनविले. अंतराळ युगात देशाला नेऊन उपग्रह, मिसाइल्स, आधुनिक युद्धसाहित्य अशा अनेक बाबींची पायाभरणी केली. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी मूलभूत धोरणे राबविली. आसाममधील बोडो आंदोलन आणि पंजाबमधील खलिस्तान चळवळ यांचा त्यांनी अतिशय कठोरपणे बीमोड केला. त्याच वेळी 1975 मध्ये सिक्कीमसारखे शेजारील छोटे राज्य भारतात विलीन करून घेऊन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनाही अवाक केले.

आज दुर्दैवाने केंद्रातील उजवी विचारसरणी मानणाऱ्या शक्ती केंद्रात सत्तेत आहेत. काँग्रेस विचारांचे कणखर नेते सरदार पटेल यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. हा इतिहास विसरून केवळ सत्तेच्या राजकारणासाठी सरदार पटेलांचा मोठा पुतळा उभा करून आपणच त्यांचे खरे वारस आहोत, असा दावा ही मंडळी करीत आहे, हे निश्चितच हास्यास्पद आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींचे योगदान पुसण्याचादेखील या शक्ती प्रयत्न करीत आहेत. मात्र जनतेच्या हृदयात विराजमान झालेल्या देशाच्या या दोन महान काँग्रेस नेत्यांचे स्थान जनतेच्या हृदयात ध्रुव ताऱयाप्रमाणे अढळ आहे. त्यांचे योगदान कधीच पुसले जाऊ शकत नाही. इंदिरा गांधींनी सदैव लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या काँग्रेसच्या विचारांची शिदोरी घेऊन देशातील गोरगरीब, श्रमिक, अल्पसंख्याक, महिला, आदिवासी, मागासवर्गीय आदींच्या कल्याणासाठी राज्य केले. त्याचबरोबर पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळ मोडून काढताना अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई करताना त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. दुर्दैवाने यातूनच त्यांची हत्या झाली. बलिदान द्यावे लागले तरी बेहत्तर, मात्र देशाचे तुकडे होऊ देणार नाही ही प्रबळ भावना त्यांच्या मनात सतत तेवत राहिली होती.

1980 ते 1984 या काळात पंजाब आणि आसाममधील परिस्थिती तणावपूर्ण होती. त्या वेळी इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख राममूर्ती आणि इतर अधिकाऱयांनी एक फाइल तयार केली. सुरक्षा व्यवस्थेतील विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱयांना दूर करण्यासाठी इंदिरा गांधी यांची मान्यता घेण्याचा प्रस्ताव त्यात होता. मात्र इंदिरा गांधी यांनी फाइलवर सही करण्यास स्पष्ट नकार दिला. जात किंवा धर्माच्या आधारे सरकारी अथवा वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेतील कोणालाही दूर करणे पंतप्रधानपदाला शोभणारे नाही, असे त्यांनी सांगितले. ‘‘मी सर्वधर्मसमभाव मानणाऱया देशाची पंतप्रधान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलगी आणि महात्मा गांधी यांची अनुयायी आहे. प्राण गेला तरी चालेल, पण जात आणि धर्माच्या आधारे माझ्या सुरक्षा व्यवस्थेतील कोणालाही वगळणार नाही,’’ अशी त्यांची भूमिका होती. पुढे इंदिरा गांधी यांना प्राण गमवावे लागले. मात्र देशाच्या एकात्मतेशी त्यांनी तडजोड केली नाही, हा किस्सा नानासाहेब गोरे यांनी श्रद्धांजली सभेत सांगितला होता. जातीभेद न करता राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही जपणे, हीच इंदिरा गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल!