ठाण्यात पोलीस एकनाथ शिंदे यांचे गुंड म्हणून काम करतायत, कुठे आहेत मुख्यमंत्री? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे.

”ठाण्यात पुर्णेकर हत्या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केली आहे. त्यांच्या पार्श्वभागात अॅसिड, लाल मिरचीची पावडर असे ज्वलनशील पदार्थ टाकले आहेत. कुठे आहे आपले मुख्यमंत्री, कुठे आहे संवेदनशीलता? ठाण्याचे पोलीस पालकमत्र्यांच्या घरी धुणी भांडी करतायत का? आम्ही गेलो होतो तेव्हा बोबडी वळली होती त्यांची. आम्ही या नराधम पोलिसांची नावं जाहीर करणार आहोत. त्यांच्या घरावर मोर्चे काढणार आहोत. लोकांना समजलं पाहिजे की कोण होते ते”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना जमत नसेल तर त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री नापास आहेत त्यांना जमत नसेल तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे. राज्याची कायदा सुव्यवस्था कुठे आहे? का ते इतके हतबल झाले आहेत? कुणी कुणावरही हल्ला करतोय, बंदूका रोखतोय. पोलीस गुंडाच्या भूमिकेत आहेत. पोलिसांनी एकनाथ शिंदेंचे गुंड म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. पण या पोलिसांना मला सांगायचं आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. जर तुम्ही खाकी वर्दी घालून गुंडगिरी करत असाल तर भविष्यात त्याच लोकांना गुंडासारखं मारलं जाईल. एन्काऊंटर होईल. तुमच्या घरावर मोर्चा काढू. इतकी अमानुषता एका बाईसाठी व तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी? कोण आहे ती? या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे व उपमुख्यमंत्र्यांच्या काय सुरू आहे ते मला कळत नाहीये, असे संजय राऊत म्हणाले.