
>> संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार
प्रताप आसबे हा ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील सहकारी आणि त्याहीपेक्षा सुमारे 50 वर्षांपासूनचा मित्र. तो अलीकडे अधूनमधून आजारी असायचा, पण इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. पंधरा दिवसांपूर्वी तो भेटला, नंतर फोनवर बोलणं झालं आणि काल रुग्णालयात भेटायला गेलो, तेव्हा तो या जगात नव्हता. राजकीय, सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार अशा दोन भूमिकेत वावरणाऱया प्रताप आसबेचा त्याच्या बातम्या, लेख, विश्लेषण यांचा मी चाहता होतो. साक्षेपी पत्रकार, विश्लेषक असलेल्या आसबेची लेखणी राजकारण्यांना कधी सुईसारखी टोचायची, तर कधी जायबंदी करायची. आसबे यांच्या बातम्या आणि ‘महाराष्ट्र देशी’ हा स्तंभ आम्ही वाचायचो, असं सांगणारे असंख्य लोक भेटतात. त्याने लेखणीचा वापर तलवारीसारखा केला, पण त्यात कधी विखार नव्हता. त्याने राजकारण्यांचे, सत्ताधाऱयांचे प्रशासकीय व अन्य निर्णय, राजकीय, सामाजिक भूमिका यांच्यावर शाब्दिक हल्ले केले; पण वैयक्तिक टीका वा निंदा केली नाही.
प्रताप साक्षेपी पत्रकार होता. त्याचं विश्लेषण, विवेचन आणि माहिती अचूक असायची. त्याच्या लिखाणाला ग्रामीण मराठीचा गंध होता. विषय कितीही गंभीर असला तरी त्याची शैली सोपी व सुटसुटीत होती. ती वाचकांना खूप भावायची. युवक क्रांती दल व समाजवादी चळवळीतून पत्रकारितेत आलेल्या आसबेची मते ठाम होती. जातीयवाद व धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाला त्याचा विरोध होता. त्यामुळे मतांसाठी तसे राजकारण करणाऱ्या सर्वांवर त्याने टीका केली. तो शरद पवार वा काँग्रेसचा समर्थक असल्याचे आरोप काही पत्रकारांसह अनेकांनी केले, पण 1990-91 या काळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या राजकारणावरही तो तुटून पडला होता. राज्यात भेदभाव न करणारं, ग्रामीण हिताचं आणि धर्मनिरपेक्ष सरकार असावं, अशी त्याची इच्छा असायची. त्यामुळे शिवसेना व भाजपला विरोध असला तरी त्याने तत्कालीन युती सरकारवर निष्कारण टिप्पणी केली नाही. अयोध्येतील बाबरी मशीद पाडत असताना प्रताप तिथं होता, पण बातमीत त्याने कधीही स्वतःच मत येऊ दिलं नाही. कश्मीर खोरं 1990 च्या दशकात पेटलं असताना तो तिथं पोहोचला. त्याचं वार्तांकनही त्याने कोणताही आविर्भाव न आणता केलं. बातमीत स्वतःची मतं असू नयेत, ती नावानं व लेखाद्वारे मांडावीत, हा पत्रकारितेचा निकष त्यानं कायम पाळला.
पत्रकारितेत येण्यापूर्वी आसबे युक्रांदचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता. शेतमजुरांमध्ये तो काम करत होता. सोलापूरला असताना मेडिकल विद्यार्थी आंदोलनात तो होता, पुढे 1977 साली गिरणी कामगार सभा उभी राहिली तेव्हा तो व हुसेन दलवाई त्याचं पूर्णवेळ काम करत. जनता पक्षाच्या फुटीनंतर या संघटनेची शकलं झाली तेव्हा गॅस सिलिंडर घरोघर पोहोचवणाऱ्या कामगारांची संघटना त्यानं उभी केली. आपण पत्रकार होऊ, असं त्याच्या स्वप्नातही नव्हतं. त्याला माझ्यासह अनेकांनी पत्रकारितेत येण्याचा आग्रह धरला आणि त्यामागे कारण होतं, स्व. अण्णासाहेब पाटील यांनी 1982च्या आसपास सुरू केलेलं मराठा आंदोलन. त्यावर त्याने दोन्ही बाजू मांडणारा जो लेख लिहिला तो खूप गाजला. शिवाय त्याचा अभ्यास, वाचन, आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि लिखाणातील स्पष्टता लक्षात आली. त्यानंतर तो ‘नवशक्ति’मध्ये व नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आला. तिथे त्याच्या लेखणीला धार आली आणि बहरही. आसबे यांचं लिखाण सर्व वर्गांतील लोक गांभीर्याने घेतात, अशा शब्दांत गोविंद तळवळकर यांनी त्याचं जाहीर काैतुक केलं होतं. प्रताप आसबेची महाराष्ट्रातील धर्मभास्कर वाघ प्रकरणावरील बातम्यांची मालिका गाजली होती. तेव्हा त्याला धमक्या आल्या. काही राजकारणी नाराज झाले होते; पण आसबेने कोणाचा आनंद वा नाराजी यांचा विचारच केला नाही. त्याचा पेहराव व वागणं यांमुळे अनेकांना खासगी वेशातील पोलीस अधिकारी वाटायचा. पोलीसही त्याला सलाम करायचे. तो वरवर खूप कठोर वाटायचा. पण तो मृदू स्वभावाचा होता. भावनाविवश झालेल्या प्रतापच्या डोळय़ांतील पाणी आम्ही पाहिलं आहे. हेमंत कुमार हा त्याचा आवडता गायक. आम्ही त्याच्या तोंडून ‘ये नयन डरे डरे’ ‘या दिल की सुनो सुनो’, ‘भुला दो यूंही ये प्यार मेरा’ ही गाणी ऐकली आहेत. आमच्यासह आसबेचे अनेक मित्र होते. मात्र हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर आणि काही युक्रांदीय हे त्याचे सच्चे मित्र होते. त्याच्या निधनानंतर मुणगेकर व दलवाई यांना रडताना पाहून त्याची खात्रीच पटली.






























































