यूपी वॉरियर्सने सोफीला बनवले करोडपती; डब्ल्यूपीएल लिलावात पैशांचा पाऊस, किरण नवगिरेवर दिल्लीची 75 लाखांची बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला प्रीमियर लीगच्या (डब्लूपीएल) पाचव्या हंगामासाठी सुरू असलेल्या खेळाडूंच्या लिलावात फ्रेंचायझींनी आपल्या पसंतीच्या खेळाडूंवर बोली लावण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू सोफी मोलिन्यूक्स हिच्यासाठी यूपी वॉरियर्सने तब्बल एक कोटी दहा लाख रुपये मोजले. हिंदुस्थानी फलंदाज किरण नवगिरेला दिल्ली कॅपिटल्सने 75 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल केले. मात्र श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू आणि हिंदुस्थानची माजी 19 वर्षांखालील जगज्जेती श्वेता सहरावत यांच्यासारख्या खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही.

मोलिन्यूक्ससाठी यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चुरस रंगली. अखेर यूपीने बाजी मारत तिला एक कोटी दहा लाख रुपयांत खरेदी केले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. हिंदुस्थानच्या अष्टपैलू स्नेह राणाला यूपीने 30 लाख रुपये देत संघात घेतले. ऑस्ट्रेलियाची ग्रेस हॅरिस आणि यष्टिरक्षक सुषमा वर्मा यांनाही यूपीने प्रत्येकी 30 लाख रुपयांत खरेदी केले.

किरण नवगिरेसाठी दिल्लीची बाजी

किरण नवगिरे ही लिलावातील पहिली खरेदी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने तिच्यासाठी 75 लाख रुपयांची बोली लावली. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सनेही तिच्यासाठी प्रयत्न केले, मात्र दिल्लीच्या अंतिम बोलीपुढे मुंबईने माघार घेतली. गुजरात जायंट्सने यष्टिरक्षक-फलंदाज जी. कमलिनीला 40 लाख रुपयांत खरेदी केले. मुंबई इंडियन्सने दिशा कासटला तिच्या दहा लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले.